चेंज इज ओन्ली कॉन्स्टन्ट (भाग २)... विनीत वर्तक ©
प्रत्येक मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन ही एक लाईफलाईन आहे. असा एकही मुंबईकर नसेल ज्याने कधी मुंबईत राहून ट्रेन ने प्रवास केला नसेल. माझी तर ट्रेनशी नाळ अगदी जन्मापासून जुळली आहे असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. रेल्वे लाईन ला जवळपास खेटून असलेल्या घरामुळे ट्रेन चा आवाज जन्मापासून भरून राहिला तो आजपर्यंत. त्यामुळेच लोकल ट्रेन किंवा एकूणच भारतीय रेल्वे च्या बदलांचा मी एक मुक साक्षीदार आहे. काही वर्षांपूर्वी रेल्वे अर्थसंकल्प हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय होता त्यातल्या त्यात मुंबईकरांसाठी थोडासा जास्तीच. किती नवीन गाड्या या वर्षी सुरु होणार? मुंबई करांच्या पदरी दरवर्षी प्रमाणे निराशा की आशेच्या काही गोष्टी घडल्या यावर कित्येक महिने चाललेल्या चर्चांमध्ये मी माझा सहभाग दिलेला होता. पण गेल्या काही वर्षात कात टाकल्याप्रमाणे भारतीय रेल्वे मधे खूप मोठ्या प्रमाणावर बदलांचे वारे वाहू लागले. आता तर त्या वाऱ्यांनी इतका जोर धरला आहे की येत्या काही वर्षात ही नक्की भारतीय रेल्वेच आहे न की आपण परदेशात आहोत असा प्रश्न आपल्याला पडू शकेल. त्यामुळेच मला पुन्हा एकदा असं वाटते आहे की 'चेंज इज ओन्ली कॉन्स्टन्ट'.
जगातील तिसरं सगळ्यात मोठ रेल्वे नेटवर्क भारतात आहे. भारतात रोज जवळपास २.५ कोटी लोक रेल्वे ने प्रवास करतात आणि त्यात एकट्या मुंबईचा वाटा ७५ लाख प्रवाशांचा आहे. १ लाख २८ हजार किलोमीटर च्या रुळांच्या लांबीवर १३,००० पेक्षा जास्ती ट्रेन धावत असतात. हे आकडेच सांगतात की एकट्या मुंबईत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही कित्येक देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच भारतीय रेल्वे च व्यवस्थापन हे तितकचं कठीण आहे. त्यात भरीस भर म्हणून होणारा भ्रष्टाचार, सरकारी मानसिकता, राजकीय हस्तक्षेप, तसेच भारतीयांची मानसिकता या सगळ्या गोष्टी भारतीय रेल्वे च्या वाढीसाठी किंवा एकूणच त्याचा दर्जा उंचावण्यासाठी सगळ्यात मोठ्या अडचणीच्या होत्या. परदेशातून बुलेट ट्रेन, तिथल्या मेट्रो ट्रेन किंवा रेल्वेतून फिरताना मिळणाऱ्या सुविधा, प्रवासाचा दर्जा आणि स्वच्छता या सर्व गोष्टी आपल्या भारतात कधी येतील असा विचार अनेकदा मनात यायचा. यासाठी अनेक दशके वाट बघावी लागेल हेच उत्तर मिळायचं.
राजकीय इच्छाशक्ती, सरकारी यंत्रणा, वापर करणारी जनता यांची बदल करून दाखवण्याची इच्छा असेल तर 'स्काय इज द लिमिट' हे आज भारतीय रेल्वे ने सिद्ध करून दाखवलं आहे. काही वर्षांपूर्वी भारतीय रेल्वे ची स्टेशन, ट्रेन आणि एकूणच यंत्रणा यामध्ये खूप त्रुटी होत्या. खराब कोंदट असणारी स्टेशन, प्लॅटफॉर्म वर येण्या जाण्यासाठी अपुरी असलेली व्यवस्था, स्टेशन च्या ब्रिज वर होणारी गर्दी, वयस्क आणि महिलांना होणारा त्रास, जागोजागी असणारा कचरा हे नॉर्मल होतं. त्याच वेळी रडत खडत जाणाऱ्या ट्रेन, त्यातील टॉयलेट आणि जेवणाची व्यवस्था, ट्रेन मधील एकूणच निराशाजनक वातावरण या सगळ्या गोष्टी भारतीय रेल्वे च्या एकप्रकारे इमेज बनल्या होत्या. जेव्हा इतर प्रवासाचे मार्ग कात टाकत होते तेव्हा प्रत्येक भारतीयाची नाळ जुळलेली रेल्वे मात्र चाचपडत होती. पण गेल्या काही वर्षात भारतीय रेल्वेच्या या इमेज ला बदलावण्याचे प्रयत्न अगदी सगळ्याच पातळीवर केले गेले ज्यामुळे आज झपाट्याने भारतीय रेल्वे एका नव्या भारताचं आणि भारतीय मानसिकतेचं प्रतिनिधित्व करते आहे.
गेल्या काही वर्षात भारतीय रेल्वे मधील स्वच्छता कमालीची वाढलेली आहे. रेल्वे स्टेशन वर बसवलेले सरकते जिने, लिफ्ट आणि इतर व्यवस्था यात खूप बदल झाला आहे. रेल्वे स्टेशन वर जाणं आता एक सुखद अनुभव वाटू लागला आहे. ट्रेन चा वाढलेला स्पीड आणि वक्तशीरपणा अनेकदा सुखद आश्चर्याचा धक्का देतो आहे. भारतीय रेल्वे आता एका नव्या रूपात समोर येऊ लागली आहे. मुंबईकरांसाठी बोलायचं झालं तर घामाच्या धारांची जागा आता एसी च्या थंड हवेच्या झुळूकेने घेतली आहे. अर्थात एसी लोकल कधी हव्यात, त्यांच्या वेळा आणि फ्रिक्वेन्सी हे मुद्दे वादाचे असू शकतील. पण त्यांनी मुंबईकरांचा प्रवास सुखकर केला आहे हे कोणीच नाकारू शकत नाही.
वंदे भारत एक्सप्रेस ने खऱ्या अर्थाने भारतीय रेल्वे आणि भारतीय रेल्वे प्रवासाचं चित्र संपूर्णपणे बदलायला सुरवात केली आहे. कोणत्याही नवीन गोष्टींचं स्वागत भारतीय थोडं नाक मुरडून करतात आणि वंदे भारत एक्सप्रेस ही त्याला अपवाद नव्हती. आत्मनिर्भर भारताचं प्रतिनिधित्व करणारी ही भारतीय रेल्वे आज जागतिक स्तरावर एक अभ्यासाचा विषय झाली आहे. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचा रेल्वे प्रवास आज वंदे भारत देशाच्या विविध भागात दररोज करते आहे. ही ट्रेन इतकी यशस्वी ठरली आहे की झालेल्या ट्रेन मधील १-२ अपवाद वगळले तर बाकी सर्व ट्रेन १००% जास्त कॅपॅसिटी ने धावत आहेत. एका वर्षात या ट्रेन ने भारतीय रेल्वे ला १०० कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवून दिलं आहे. भारतीय रेल्वे ने वंदे भारत एक्सप्रेस ची लोकप्रियता लक्षात घेऊन तब्बल १०२ वंदे भारत २ तर २०० वंदे भारत ३ चे टेंडर हा लेख लिहण्याआधीच भारतीय रेल्वे ने मेक इंडिया अंतर्गत भारतीय कंपन्यांना दिले आहे. ज्यांची एकत्रित किंमत ४.५ बिलियन (४५० कोटी ) अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास ३५,००० कोटी रुपये इतकी प्रचंड आहे.
येत्या २-३ वर्षात वंदे भारत एक्सप्रेस जवळपास भारतातील प्रत्येक पॅसेंजर ट्रेन ला रिप्लेस करणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ०-१०० किलोमीटर चा वेग अवघ्या ५४ सेकंदात गाठण्यास सक्षम असून १८० किलोमीटर / तास वेगाने सुरक्षित पद्धतीने धावण्याची तिची क्षमता आहे. भारतीय रेल्वे मधील रुळांच्या क्षमतेमुळे आज जरी तिचा वेग मर्यादित ठेवण्यात आला असला तरी येत्या काळात तब्बल २०० किलोमीटर / तास वेगाने ती धावणार आहे. या सोबत भारत आणि जपान यांच्या संयुक्त मदतीने तयार होत असलेल्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन च काम वेगाने सुरु आहे. २०२६ पर्यंत भारतात पहिल्यांदा बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता आहे. काही राजकीय नेत्यांच्या आडमुढे धोरणांमुळे या प्रकल्पाला उशीर झाला असला तरी येत्या काही वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा आहे.
चेंज इज ओन्ली कॉन्स्टन्ट हे स्विकारण्याची मानसिकता भारतीयांनी आत्मसात केली पाहिजे. वंदे भारत ट्रेन असो वा बुलेट ट्रेन किंवा अगदी एसी ट्रेन त्याने आम्हाला काय फायदा? गरिबाला काय फायदा? या राजकीय मानसिकतेमधून बाहेर पडण्याची गरज आहे. होऊ घातलेल्या बदलांचे परीणाम दिसायला काही वेळ जावा लागतो. काही वर्षांपूर्वी भारतीय रेल्वे ने केलेल्या बदलांची फळे आज आपण चाखत आहोत. आज जे बदल होऊ घातले आहेत त्याचे परीणाम दिसायला काही काळ जाणार हे निश्चित आहे. पण बदल होत आहेत ते महत्वाचं आहे कारण तेच शाश्वत आहे. ते होत आहेत म्हणून आपली प्रगती होत आहे. एक देश म्हणून आपण सर्व १४० कोटी भारतीय एक पाऊल पुढे टाकत आहोत. तेव्हा बदलांना राजकीय आणि कूपमंडूक वृत्तीतून विरोध करण्यापेक्षा त्या बदलांच एका आत्मनिर्भर भारताचा भाग होणं यात आपलं हित सामावलेलं आहे.
भारतात वेगवेगळ्या आघाड्यांवर होऊ घातलेल्या बदलांविषयी पुढल्या भागात "चेंज इज ओन्ली कॉन्स्टन्ट".
जय हिंद!!!
क्रमशः
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.