Tuesday 14 February 2023

'ईटा करीना'... विनीत वर्तक ©

 'ईटा करीना'... विनीत वर्तक  ©

ईटा करीना' हे नाव सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने खूपच अपरिचित असेल. ही एक ताऱ्यांची रचना आहे ज्यात दोन तारे आपसात एकमेकांभोवती फिरत आहेत. जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते तसेच दोन तारे एकमेकांभोवती फिरत आहेत. ईटा करीना बघताना एक सामान्य रचना वाटत असली तरी विश्वात असणाऱ्या अनेक ताऱ्यांच्या रचेनपेक्षा ईटा करीना वेगळी आणि खूप महत्वाची रचना आहे. ज्यात या दोन्ही ताऱ्यांची तेजस्विता ही सूर्याच्या प्रकाशापेक्षा ५ मिलियन (५० लाख) पटीने जास्त आहे. ७५०० प्रकाशवर्ष इतक्या अंतरावर हे तारे पृथ्वीपासून आहेत. ( एक प्रकाशवर्ष म्हणजे एका वर्षात प्रकाश जितक अंतर कापेल ते अंतर. प्रकाशाचा वेग सुमारे ३,००,००० किलोमीटर / प्रती सेकंद) 

'ईटा करीना' रचनेतील एक तारा सूर्यापेक्षा १०० पट मोठा आहे. इतक्या प्रचंड मोठा ताऱ्याच्या जवळच तितकाच दुसरा मोठा तारा आहे. सूर्यापासून शनी ग्रह जितका लांब आहे. तितकच हे अंतर आहे. आपल्याला हे अंतर जास्ती वाटल तरी अवकाश अंतराच्या मानाने हे अगदी कमी अंतर आहे. सूर्यापेक्षा तब्बल ५० लाख पटीने तेजस्वी असणारे दोन तारे एकमेकांच्या इतक्या जवळ आहेत की त्या दोघांच्या तेजस्वितेने तिथलं संपूर्ण अवकाश प्रकाशमान असते. या दोन्ही ताऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणात फ्युजन प्रक्रिया सुरु असते. या प्रक्रियेतून निर्माण झालेली उर्जा आणि प्रकाश हेच ताऱ्याला इतक्या प्रचंड स्वरूपात प्रकाशमान करत असतात. ताऱ्याच्या मधून निघणारी उर्जा आणि आण्विक किरण हे बाहेरच्या दिशेने प्रचंड बल निर्माण करते. पण त्याच वेळी ताऱ्याच्या प्रचंड वस्तुमानामुळे त्याच गुरुत्वीय बल हे उलट्या दिशेने कार्यरत असते. ह्या दोघातील समानता ताऱ्याला एकसंध ठेवते. म्हणजे ह्या दोघातील कोणतही बल जर कमी जास्त झाल तर ताऱ्याचा अस्त ठरलेला आहे.

कोणत्याही ताऱ्याचा जन्म होतानाच त्या ताऱ्याचा अस्त हा कसा होणार हे ठरलेलं असते. अणुप्रक्रियेमुळे निर्माण झालेली उर्जा किंवा बल आणि आपल्या वस्तुमानामुळे असलेलं गुरुत्वीय बल हे जोवर समान तोवर ताऱ्याच आयुष्य असते. ज्या वेळेला ताऱ्याच आयुष्य संपुष्टात येत असते तेव्हा न्यूक्लिअर फ्युजन आणि गुरत्वीय बल ह्यांच्यातील एकसंधपणा संपुष्टात येतो. सूर्याच्या बाबतीत बोलायचं झालच तर १ बिलियन वर्षानंतर सूर्याच्या प्रकाशात १०% वाढ होईल. ही  वाढ जास्ती नसली तरी तिचा पृथ्वीवर खूप मोठा परिणाम होईल. त्या नंतर सूर्याच आकारमान इतक वाढत जाईल की बुध, शुक्र ग्रह तर आपली पृथ्वी पण त्याने गिळंकृत केलेली असेल. तो एक रेड जायंट तारा झालेला असेल. त्यानंतर त्याचा प्रवास व्हाईट डार्फ ताऱ्याकडे होईल. 

सूर्याला जसा मृत्यू येणार आहे तसा प्रत्येक ताऱ्याचा होईल असं नसते. ताऱ्याच्या वस्तुमानावर त्याचा शेवट काय होणार हे ठरलेल असते. 'ईटा करीना' च्या बाबतीत ते वेगळ आहे. ईटा करीना मधील रेडीयेशन बल इतक प्रचंड आहे की त्याच्या गुरुत्वीय बलाला ते येणाऱ्या काळात वरचढ ठरेल. यामुळे त्यातील समतोल राखण त्याला अशक्य होत जाईल. रेडियेशन बल इतक प्रचंड होईल की त्यामुळे या दोन्ही ताऱ्यांचा महाकाय विस्फोट होईल (हायपरनोव्हा). कदाचित तो झाला ही असेल. कारण आपण आत्ता ज्या ईटा करीना चा प्रकाश बघत आहोत तो ७५०० वर्षापूर्वी तिकडून निघालेला आहे. इतक्या प्रचंड मोठ्या दोन ताऱ्यांचा स्फोट मानवजातीच्या पूर्ण प्रवासात कोणीच बघितलेला नाही. त्यामुळेच जेव्हा तो होईल तेव्हा तो असेल एक हायपरनोव्हा. हा हायपरनोव्हा एखाद्या सुपरनोव्हा पेक्षा तब्बल १०० पट जास्ती क्षमतेचा असेल. सूर्यापेक्षा ३० पट मोठा असलेल्या ताऱ्याचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा हायपरनोव्हा होतो. ईटा करीना मधील तारे सूर्यापेक्षा १०० पट मोठे आहेत. त्यामुळे आपण अंदाज लावू शकतो या स्फोटाचा नजारा अवकाशात काय असेल. 

ईटा करीना च्या आसपास जर एखादी सोलार रचना असेल तर त्यांचे दिवस भरले म्हणून समजा. याच्या कित्येक प्रकाशवर्ष जवळ असणारे तारे, ग्रह या स्फोटातून निघालेल्या प्रकाश आणि उर्जा यांनी नाही तर एक्स रे आणि गॅमा रे यांच्या माऱ्यामुळे नष्ट होतील. या किरणांचा मारा इतका प्रचंड असेल की आजबाजूचे अगदी शंभर ते हजारो प्रकाशवर्ष दूर असलेल्या ग्रह, तारे आणि आकाशगंगा यांच्या वर या रेडीयेशन चा परिणाम जाणवेल. त्याचं पूर्ण आयुष्य किंवा भविष्य बदलवण्याची ताकद ह्या विस्फोटात असेल.

आपल्या डोक्यात आलंच असेल की मग याचा पृथ्वीवर काय परिणाम होईल. तर पृथ्वी ७५०० प्रकाशवर्ष या ताऱ्यापासून लांब आहे. कोणतही रेडीयेशन हे इतक्या मोठ्या अंतरावर कमालीच घटते. तरीसुद्धा इतक्या लांब असून पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातून हे तारे विस्फोट झाल्यावर चंद्राइतके प्रखर, तेजस्वी उघड्या डोळ्यांनी दिसू शकतील. त्यातून पृथ्वीवर आदळणाऱ्या गॅमा रे आणि एक्स रे जरी पृथ्वीच्या जीवनमानावर फरक नाही करू शकले तरी नक्कीच चुंबकीय क्षेत्र तसेच इतर गोष्टींवर परिणाम करतील अस अनुमान आहे. ईटा करीनाचा विस्फोट किंवा हायपरनोवा नक्कीच अवकाशात बघणं हा एक वेगळा अनुभव असेल. प्रचंड अश्या ताऱ्याचा मृत्यू याची देही डोळा बघण म्हणजेच आपण किती सूक्ष्म आहोत याचा अनुभव घेणं. नक्कीच हे सगळ खूप रोमांचक असेल. एक प्रश्न आपण या निमित्ताने स्वतःला विचारूयात की इतक्या प्रचंड मोठ्या 'ईटा करीना' ताऱ्याला ही मृत्यू चुकला नाही तर आपण कोण? नाही का?

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment