Monday 12 June 2023

'काळ आला होता.. पण वेळ आली नव्हती'... विनीत वर्तक ©

 'काळ आला होता.. पण वेळ आली नव्हती'... विनीत वर्तक ©

असं म्हणतात, "मारने वाले से बचाने वाला हमेशा बड़ा होता हैं " या उक्तीची प्रचिती पुन्हा एकदा संपूर्ण जगाने घेतली आहे. ही घटना आहे कोलंबिया देशात घडलेली. ज्या घटनेने संपूर्ण जगाला एक नवीन प्रेरणा मिळाली आहे. १ मे २०२३ रोजी एक आई आपल्या ४ मुलांना घेऊन कोलंबिया देशामधल्या अमेझॉनच्या  जंगलात असलेल्या अराराकुआरा या गावातून सॅन जोस डेल ग्वाविअरे इकडे एका प्रायव्हेट विमानाने निघाली. १ पायलट, १ लोकल लिडर आणि १ या मुलांची आई मॅग्डालेना मुकुटुय व्हॅलेन्सिया अशी ३ प्रौढ माणसं आणि तिच्या सोबत असलेली ४ मुलं ज्यात 13 वर्षाची लेस्ली जेकोबॉम्बेअर मुकुटुय आणि तिची ९ आणि ४ वर्षाची भावंडं तर एक अगदी ११ महिन्याचं बाळ असे ७ जण या विमानात होते.

सेस्ना सिंगल-इंजिन प्रोपेलर विमानाने उड्डाण केल्यावर काही वेळाने त्याच्या इंजिनात बिघाड झाला. एकच इंजिन असल्याने विमान कोसळण्या पलीकडे दुसरा कोणताच पर्याय पायलटकडे नव्हता. त्यांनी तात्काळ रेडिओवर डिस्ट्रेस सिग्नल पाठवला. "मे डे,,, मे डे...मे डे... असा शेवटचा संदेश पाठवत ते विमान अमेझॉन च्या घनदाट जंगलात कोसळलं. विमान कोसळल्या नंतर विमानाचा कोणताही मागमूस लागला नाही. तब्बल २ आठवडयांनी १६ मे ला हे विमान अमेझॉन च्या घनदाट जंगलात शोधण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली. अनेक प्रयत्ना नंतर कोसळलेल्या विमानाचे अवशेष शोध पथकाला मिळाले. विमानांच्या त्या अवशेषात शोध पथकाला ३ प्रेत सापडली. दोन पुरुष आणि प्रवास करणाऱ्या त्या महिलेचे प्रेत तर सापडलं पण त्या ४ मुलांचा कोणताही मागमूस लागला नाही. आसपास शोध घेतल्यावर पण हाताशी काही लागलं नाही. पण तिकडे काही अंतरावर पडलेल्या काही बॉक्स वरून अपघातानंतर ही मुलं जिवंत असल्याचे पुरावे शोध पथकाला मिळाले.

चार मुलं अमेझॉन च्या जंगलात जिवंत असल्याचा अंदाज येताच कोलंबियन सरकारने कोलंबियन आर्मीला शोध कार्यात जुंपलं. कोलंबियन आर्मी ची १५० लोकांची टीम अमेझॉन च्या जंगलात या ४ मुलांचा जीव वाचवण्यासाठी २४ तास शोध कार्याला लागली. कोलंबिया हा देश युद्धाच्या ज्वरात होरपळतो आहे. आर्मी आणि सामान्य नागरीक यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचलेला आहे. पण त्या ४ मुलांना वाचवण्यासाठी आपली दुश्मनी बाजूला ठेवत गावातील सर्वसामान्य लोक ही या शोधकार्यात सहभागी झाले. गावातील लोकांना आर्मीपेक्षा अमेझॉन च्या जंगलाचा जास्ती अंदाज होता. त्यानंतर जवळपास दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ अमेझॉन च्या जंगलाचा कित्येक किलोमीटर चा प्रदेश पिंजून काढल्यानंतर ४० दिवसांनी ही ४ मुलं सुखरूप अवस्थेत एक चमत्कार म्हणता येईल अश्या स्थितीत शोध पथकाला सापडली.

तब्बल ४० दिवस ती ४ मुलं एकमेकांना साथ देत अमेझॉन च्या जंगलात मच्छर, पशु, हिंस्त्र प्राणी, साप, विंचू ते पाऊस अश्या सगळ्याचा धैर्याने सामना करत जिवंत होती. ४० दिवस ते कसे जिवंत राहिले याची कहाणी ऐकल्यावर तर शोध पथकाच्या जवानांच्या हातावर काटे उभे राहिले. या ४ मुलांना जिवंत ठेवण्यात प्रमुख वाटा होता तो १३ वर्षीय लेस्ली जेकोबॉम्बेअर मुकुटुय हिचा. १३ वर्षाची लेस्ली आई सोबत गावाच्या बाजूला असलेल्या घनदाट अमेझॉन च्या जंगलात वावरली असल्याने जंगलात काय खाल्लं जाऊ शकते याच ज्ञान तिला होतं, रानटी फळ, गवत आणि झाड खाऊन या ४ जणांनी एक दोन नाही तर तब्बल ४० दिवस काढले. रात्रीच्या वेळी जंगली श्वापदांपासून वाचण्यासाठी त्यांनी झाडाच्या ढोलीचा आसरा त्यांनी घेतला. विमानाचा अपघात झाल्यानंतर त्यांची आई ४ दिवस जिवंत होती. जखमी असलेल्या आईने आपल्या मुलांना काही झालं तरी जंगलात एकत्र रहा असं सांगितलं.

४० दिवसात या मुलांनी जंगलात ५ किलोमीटर चा प्रवास केला. जेव्हा ते सापडले तेव्हा त्यांची अवस्था खूप दयनीय होती. योग्य अन्न आणि पाणी न मिळाल्यामुळे  ते सर्वच अशक्त झाले होते. त्या ११ महिन्याच्या बाळाला सांभाळत या मुलांना पुढे चालणं ही अशक्य झालं होतं. मुलांचा शोध लागल्यानंतर आर्मीने त्यांना त्वरीत हेलिकॉप्टर ने हॉस्पिटल ला हलवलं. शारीरीक त्रासातून हळूहळू ही मुलं सावरत असली तरी गेल्या ४० दिवसांच्या जिवघेण्या अनुभवानंतर ही मुलं अजून त्यातून सावरली नाहीत.

जंगलाचं थोडं ज्ञान, साक्षात समोर आलेल्या यमाला परत पाठवून ही मुलं तब्बल ४० दिवसांनी पृथ्वी वरील एका घनदाट जंगलातून सुखरूप बाहेर पडली ही घटना विलक्षण अशीच आहे. मुलांची वय जास्ती ही नव्हती. अगदी १३ वर्षाची लेस्ली सगळ्यात मोठी तर बाकीची सगळी अगदी त्यांच्या बालपणात होती तर एक मुलं  तर अवघे ११ महिन्यांचे होते. त्यामुळेच त्यांचा ४० दिवसांचा संघर्ष जगात प्रसिद्ध झाला आहे. संपूर्ण जगातून या मुलांच्या धैर्याला सलाम आणि कुर्निसात केला जातो आहे. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी सुद्धा या मुलांना भेट देऊन त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. या चारही मुलांना माझा कडक सॅल्यूट आणि येणाऱ्या अनेक पिढयांना त्यांनी दिलेली मृत्यूशी झुंज प्रेरणादायी ठरेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

फोटो शोध सौजन्य :- गुगल    

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



5 comments:

  1. खूपच छान लिहिलं आहे एवढ्या धक्कादायक घटनेबद्दल! बघा third world मधल्या बातम्यांना किती low priority मिळते! आपल्या लेखनाचं कौतुक करावं तितकं थोडंच!- आशुतोष जोशी, तळेगांव दाभाडे

    ReplyDelete
  2. शब्दांकन खूपच छान वाटले वाचताना, थोडे अजून त्यांचे वर्णन चाळीस दिवसातले सांगितले असते तर आणखीन छान वाटलं असतं. ते कसे राहिले त्यांना काय त्रास झाला श्वापदांचा चां कितपत उपद्रव झाला आणि काय केलं रात्रीची काय भीती वाटली नाही वाटली या गोष्टी जरा वाचायला उत्सुकता आहे

    ReplyDelete
  3. रात्र आनी दिवस कसे काढले? हँलिकँप्टर मधुन कसे वाचले? प्राणि कुठले कुठले दिसले हे ऐकन्या साठी ही राेमांचक कथा अपुर्ण वाटते .. धंन्य ते बालक...आनी त्यांची आई...

    ReplyDelete
  4. मी रमेश गाेस्वामी नाशिक

    ReplyDelete