'लास वेगास' ... स्वप्नांचं शहर
'लास वेगास', जुगार खेळणाऱ्या जगातील प्रत्येकाला तोंडपाठ असणारं शहर. स्वप्नं दाखवणारं आणि स्वप्नं हिरावून घेणारं हीच त्याची खरी ओळख. अमेरिकेतील नेवाडा राज्यामध्ये हे शहर १९०५ साली वसवण्यात आलं. जवळपास ठणठणीत कोरडं असणारं तापमान वर्षाला ३८ ते ४० डिग्री पर्यंत जाणार. आजूबाजूला वाळवंट, आसपास कोरडा असा प्रदेश, पण आज जगातील कानाकोपऱ्यात या शहराचं नाव प्रसिद्ध आहे.
'लास वेगास'मध्ये शिरताना खूपच उत्सुक होतो. 'लास वेगास'च्या जवळच दोन महत्वाची ठिकाणं आहेत. एक म्हणजे 'एडवर्ड एअर बेस', अमेरिकेच्या लष्करी क्षेत्रात या बेसचं खूप महत्त्व आहे. दुसरी जागा जिचा खुद्द अमेरिकेने इन्कार केला आहे, पण ती आस्तित्वात आहे, ती म्हणजे 'एरिया ५१'. लष्करी सान्निध्यातील नवनवीन विमाने, अत्याधुनिक मिसाईल, जैव व केमिकल अस्त्रं शस्त्रं याच्यावर संशोधन केलं जातं, पण अतिशय गुप्तपणे, तो हा भाग. ही जागा 'लास वेगास'पासून १३३ किमी वर आहे, 'ग्रूम लेक'च्या बाजूला. लष्करी भाग असल्याने, किंवा वाळवंटात लपलेली ही जागा आहे त्यामुळे, आपण याचं दर्शन घेऊ शकत नाही. माझ्या गाईडने साधारण ही जागा कशी आहे, इकडे काय चालते, हे सांगून २ मिनिटे बस थांबवून या जागेचे खूपच दूरवरून दर्शन करवले. मी याबद्दल आधीच वाचल्याने, तो काय सांगत होता, हे ध्यानात नक्कीच येत होतं, पण ज्यांना काहीच माहीत नाही, त्यांच्यासाठी सगळंच डोक्यावरून जाणारं होतं. 'लास वेगास'ची हद्द सुरू होताच उंचचउंच बिल्डींगने माझे लक्ष वेधून घेतले. सोन्याचा मुलामा दिल्यासारखे भासणारी ही बिल्डींग म्हणजे एक कॅसिनो होता. आपण जुगाराच्या राज्यात प्रवेश केल्याची ती नांदी होती.
सगळीकडे वाळवंट, पण आजूबाजूला मधेच झाडी. शुष्क हवा, पण रस्ते एकदम अप्रतिम. माझ्या ६०० किमीच्या प्रवासात एकही खड्डा जाणवला नाही, कुठेही स्पीड ब्रेकर नाही नि कुठेही सिग्नल नाही. प्रत्येक गोष्ट कशी शिस्तीत. अमेरिकेत वाहतुकीचे नियम अतिशय कडक आहेत. तोडल्यावर होणारी शिक्षासुद्धा जबर असते, त्यामुळे कोणी ते तोडायच्या वाटेलाही जात नाही. 'लास वेगास' शहरातील मुख्य रस्त्यावर प्रवेश होताच, सगळीकडे उंचच उंच बिल्डींग, आणि प्रत्येक बिल्डींग वेगळी, प्रत्येकाची एक वेगळीच तऱ्हा. हे सगळे कॅसिनो आहेत, हे आमच्या गाईडनं सांगितलं. बेलगिओ, मिराज, ट्रम्प, एन्कोर, वयीन, सर्कस......किती तरी. सगळे एकापेक्षा एक सरस. त्यातील 'सर्कस'मध्ये मी राहणार होतो.
इकडे हॉटेल खूप स्वस्त असतात, म्हणजे माझ्या रूमची किंमत होती ४०$ म्हणजे अवघे २००० रूपये एका दिवसाचे. इतकी अप्रतिम रूम खरं तर २००$ या किंमतीची निदान असावयास हवी! मग इतकी स्वस्त कशी? तर यामागचं गुपित गाईडने मला सांगितलं. 'लास वेगास'मध्ये एक लक्षात ठेव, तू जिंक किवा हार, पण कॅसिनो नेहमीच जिंकतो, त्यांचा गल्ला नेहमीच भरतो. मला संदर्भ न लागल्याने मी अजून जास्ती खोलात त्याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला २००$ खर्च करायची तुमची तयारी होती, म्हणजे ४०$ मध्ये रूम मिळाली, तर तुम्ही ५ दिवस इकडे राहू शकता तितक्याच पैश्यात? मी म्हटलं, 'हो, ते आहेच!'. तो म्हणाला, 'मग तुम्ही १ दिवसाऐवजी ५ दिवस कॅसिनो खेळणार! तिकडे तुमच्याकडून कॅसिनो ५०००$ कमवणार!' मी हा सगळा विचार ऐकून सर्दच झालो. यावरही तो म्हणाला, 'इकडे आपण हॉटेल मधून पाठी मागच्या बाजूने आलो कारण तिकडे रिसेप्शन आहे, आणि पुढच्या बाजूला कॅसिनो, म्हणजे तुम्ही जेव्हाजेव्हा हॉटेलमध्ये शिराल, तेव्हा तेव्हा तुम्ही प्रथम कॅसिनोमधून जाल, आणि प्रत्येकवेळी तुम्हाला खेळण्याची इच्छा होईल, आणि प्रत्येकवेळी कॅसिनोचा गल्ला भरत जाईल'. मी या गोष्टीचा विचार केलाच नव्हता. अजूनही तो म्हणाला, 'तुम्ही जेव्हा रूममधून खाली यायला निघाल, किंवा तुम्हाला रूममध्ये जायचं असेल, तेव्हा प्रत्येक वेळी तुम्हाला कॅसिनोमधूनच जावं लागेल. प्रत्येक लिफ्टचं "0" बटन दाबलं, की लिफ्ट तुम्हाला कॅसिनो फ्लोअरवरच आणून सोडते, आणि वर जायचं असतं, तेव्हासुद्धा तुम्हाला इकडूनच लिफ्ट मिळते'. आता मी फक्त पडायचा बाकी होतो. माणसाच्या मानसिकतेचा इतका सूक्ष्म अभ्यास धंद्यासाठी केलेला मी तरी कुठे बघितला नाही. ही गोष्ट प्रत्येक कॅसिनोमध्ये लागू होते.
संध्याकाळी 'लास वेगास' फिरायला निघालो. तिकडे काही 'शो' असतात, लोकांना लुभावण्यासाठी. त्यातील माझ्या गाईडने ३ 'शो' बघाच, असं सुचवलं. त्यात एक होता, त्यामध्ये फक्त १८+ वर्ष अधिक अशी वयाची अट होती. त्याचं तिकीटही जवळपास १००$ इतकं होतं. मी त्याला विचारलं, 'इतकं काय आहे त्यात'? तो एकच म्हणाला, 'यांतील प्रत्येक पेन्नी ही वसूल होईल'. गेली ७५ वर्षं हा 'शो' इकडे चालू आहे, आणि नंबर-१ चा 'शो' आहे. फोन, कॅमेरा या शोमध्ये घेऊन येण्यास मज्जाव होता. १८+ असल्याने अर्ध नग्न वगैरे स्वरूपाचा असेल, अशी माझी संकल्पना खरी ठरली. पण खरंच या अर्धनग्न स्वरूपापेक्षाही जे काही सादरीकरण होतं, त्याला तोड नाही. जवळपास २०० मुली आणि त्याच ताकदीचे कलाकार, यांनी २ तासात जे काही सादर केलं, त्या कलेला, त्यांच्या नृत्याविष्काराला माझा सलाम! त्या मुली, बायका जरी पूर्ण अथवा अर्ध नग्न असल्या, तरी त्यात कुठेही बघताना त्यांना अश्लीलतेचं स्वरूप येत नव्हतं, एक सुंदर अनुभूती होती. तुम्ही कधी गेलात, तर हा 'शो' नक्की बघाच. दुसरा 'शो' जो होता, तो म्हणजे 'बलजिओ कॅसिनोचा'. यात १५ मिनिटांचा संगीताच्या तालावर कारंज्याचा जो काही आविष्कार बघयला मिळतो, त्याला तोड नाही. माझ्या कॅमेऱ्यात मी तो पूर्ण बंदिस्त केला आहे. लाईटची रचना, कारंज्यांचे फवारे, संगीताच्या तालावर बघताना आपण कोणत्यातरी दुसऱ्याच जगात आहोत असाच भास होतो. तिथून मी गेलो एका कॅसिनोमध्ये. तिकडे कॅसिनोमधील पूर्ण छत हे अश्या स्वरूपाचं रंगवलेलं आहे, की बाहेर अंधार असतानासुद्धा आपण दिवसा उभे आहोत असेच वाटत राहते. कॅसिनोच्यामध्ये बोटीमधून पॅरिसप्रमाणे फेरफटका मारता येतो. 'अप्रतिम' आणि अप्रतिम' असेच शब्द तोंडातून बाहेर पडत होते. जगातील सर्व पैसा इकडेच साठवला आहे, असंच मनोमन वाटत होतं.
रात्रभर एकूणएक कॅसिनो हिंडून झाले, खेळून झाले. जिंकलो पण! हरलो पण! गाईडचं वाक्य माझ्या मनात होतंच, की 'तुम्ही काहीही करा, शेवटी कॅसिनोच जिंकतो'. प्रत्येक कॅसिनोमधून फिरताना हेच बघितलं. लोक इतकी तन-मन लावून खेळत होते, की आजूबाजूला काय चालू आहे, याचं त्यांना काहीच पडलेलं नव्हतं. बरीचशी वृद्ध मंडळी इकडे आयुष्यभर कमावलेला पैसा फुंकायला येतात, असं कळलं. अमेरिकन लोकांकडे किती पैसा आहे, ह्याची झलक मला 'लास वेगास'मधून फिरताना पावलोपावली येत होती. तिसरा 'शो' होता, जिकडे पूर्ण-पूर्ण छत हे एक डिस्प्ले आहे, जवळपास अर्धा किमी लांब आहे. रात्रीच्या गडद अंधारात यावर गाणं लावतात. याचं चित्रीकरण हिंदी चित्रपटांतही आहे. मला नाव नाही आठवत, पण प्रियांका चोप्रा आणि रणबीर कपूर यांच्यावर चित्रित झालेले एक गाणे इकडेच चित्रित झाले आहे.
दोन दिवस 'लास वेगास' पूर्ण पालथं घातलं. खरंच हे एक स्वप्नांचं शहर आहे. लाखो लोक रोज इकडे येतात, कधीतरी श्रीमंत होण्याचं मनात घेऊन आणि काही होतातही, हे सत्य आहे! पण ही संख्या खूपच कमी. तिसऱ्या दिवशी मोर्चा वळवला तो इकडूनच जवळ असलेल्या इंजिनिअरिंग क्षेत्रात एक मानाचा मापदंड ठरणाऱ्या धरणाकडे, 'हूवर धरण'. चंद्रकोरीच्या आकारात असलेलं हे धरण नेवाडा आणि ऍरिझोना या राज्यांच्या वेशीवर वसलं आहे. १९३६ साली बांधलेलं धरण २०८० मेगावॅट उर्जेची निर्मिती करतं. कॉलोरॅडो नदीवर असलेल्या या धरणाने तयार केलेल्या पाणीसाठ्याची लांबी तब्बल १८० किमी इतकी प्रचंड आहे. यावरूनच याच्या आकाराचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. आत्तापर्यंत या धरणावरून दोन राज्यात वाहतूक होत असे, पण धरणाला असलेला धोका लक्षात घेऊन एक बायपास यावर बांधला गेला, जो २०११ साली सुरू झाला. १ मिलियन लोक दरवर्षी या धरणाला भेट देतात. 'लास वेगास' पासून अवघ्या २४ किमीवर हे धरण आहे. या धरणाला इतकं जवळून बघणं, आणि त्याच्या कार्यपद्धतीचा आढावा घेणं, हा सगळ्यात संग्रही असा क्षण होता.
जगातील सगळ्यात खोल दरी, असं जिचं वर्णन आहे, ते म्हणजे 'ग्रँड कॅनियन'. तब्बल ४४६ किमी लांब, २९ किमी रुंद आणि ६००० फूट खोल अशी तिची रचना आहे. 'कोलोरॅडो' नदीचे पात्र यातून वाहते. लाखो वर्षं 'कोलोरॅडो' नदीने इकडून जमिनीच्या भूभागाची धूप करून ही दरी तयार केली आहे. 'वेस्ट रिम' आणि 'साउथ रिम' अश्या दोन ठिकाणी आपण जाऊ शकतो, त्यापेकी 'वेस्ट रिम'ला दोन महत्त्वाची आकर्षणे आहेत. एक म्हणजे चॉपरमधून आपल्याला कोलोरॅडो नदीच्या काठाशी उतरवले जाते, आणि मग एक तास बोटीतून कोलोरॅडो नदीची सफर आणि मग परत चॉपरने दरीतून वर आणून सोडले जाते. जवळपास २००$ इतकी याची किंमत आहे. मी याचा आनंद घेतला. 'अवर्णनीय' असंच याचं वर्णन करता येईल. ही जागा 'लास वेगास'पासून १९० किमी अंतरावर आहे. अजून एक महत्वाचं स्थळ म्हणजे 'स्काय वॉक'. 'वेस्ट रिम'ला अर्धवर्तुळाकार अशी हवेत रचना केली आहे. याचा खालचा भाग हा काचेचा आहे, त्यामुळे इकडे चालताना आपण हवेत चालत असल्याचा भास होतो. याच्याखाली तब्बल ८०० फूट खोल जमीन आहे, त्यामुळे काचेवर चालताना बोबडी वळल्याशिवाय राहत नाही. हा एक अप्रतिम अनुभव आहे. ४०$ अशी याची फी आहे, पण इथली प्रत्येक गोष्ट प्रत्येक पै न पै चा मोबदला देते!!
'लास वेगास' आणि त्याच्या आजूबाजूची सगळीच स्थळे पाहणे, हे एक अवर्णनीय असा आनंद देऊन जातं. इकडे आल्यावर आपण आपली सगळी दुःखं, चिंता, जबाबदाऱ्या बाजूला ठेवून कधी या शहराशी नाळ जोडतो, कळतही नाही. कळते तेव्हा, जेव्हा आपला खिसा रिकामा होतो कॅसिनोमध्ये. आयुष्यात संधी मिळाल्यास या शहराची सफर कधीच चुकवू नका, नाहीतर तुम्ही नक्कीच एका स्वप्नाला सत्यात उतरताना मुकाल!
विनीत वर्तक.