Saturday, 21 July 2012

२६ आणि २७ जुलै २००५... दोन अविस्मरणीय दिवस..... भाग २


२६ आणि २७ जुलै २००५... दोन अविस्मरणीय दिवस..... भाग २ 

प्रियदर्शनीवरून सायनच्या दिशेने  चालायला सुरूवात केली. नेहमी ५ मिनिटांचा रस्ता आज ५ तासांचा वाटत होता. नजर जाईल तिकडे पाणीच पाणी दिसत होते. त्यात सगळी वाहने अडकून अस्ताव्यस्त पडली होती. माणसं रस्त्याच्या मधून चालत होती. आम्हीसुद्धा असंच पुढे जायचं ठरवलं. म्हटलं सायनला जाऊन पोटपूजा करू. जवळपास ३ तास झाले होते, आम्ही पाणी आणि काही खाल्ल्याशिवाय चालत होतो. पोटातसुद्धा कालचे दोन पावच होते, जे काल रात्री आम्ही खाल्ले होते. मी आणि मित्राने चालायला सुरूवात केली. प्रियादर्शनीच्यापुढे खोलगट भाग असल्याने पाणी आता कंबरेवरून छातीपर्यंत वाढलं होतं. सगळ्यांची चालताना वाट लागत होती. पायात गोळे आले होते. थंडी वाजत होती. गेले ३ तास अर्धे शरीर पाण्यामध्येच होते,  कपडे ओले, असं कुठंपर्यंत राहणार याची पुसटशी कल्पना सुद्धा मला नव्हती. चालताना बरीच काळजी घ्यावी लागत होती. सगळीकडे गटाराची झाकणं उघडल्याने त्यात पडायचा धोका होताच. सगळीकडे पाणी आणि मधून माणसांची रांग. ज्या रस्त्यावर फक्त वाहने आत्तापर्यंत मी बघितली होती, त्या रस्त्यावर हे दृश्य खूपच वेगळे वाटत होते. एक अनामिक भीती मनात होती, की आता पुढे काय??

सायनला येताच आधी काही खायला मिळते का, याचा शोध घेण्यास सुरूवात केली. पोटात अन्नाचा कण नसल्याने खूप भूक लागली होती. अंग एकदम ओलंचिंब होऊन थरथरत होतं. एक कप चहा मिळाला तर बरं होईल, या अपेक्षेने आम्ही सायनचा परिसर धुंडाळला. पण हाती काहीच लागलं नाही. सायनच्या चौकात असलेल्या हॉटेल मालकाने सांगितलं, "साहेब काही नाही हो, काल रात्री लोकांची अवस्था बघून जे काही होतं ते दिलं. काही लोकांनी तर कोथिंबीरसुद्धा नुसती खाल्ली इतकी अवस्था वाईट होती. आता माझ्या कडे काहीच नाही". हे ऐकल्यावर काही मिळेल ही आशा आम्ही सोडून दिली व वांद्रेला जायचा निर्णय घेतला. तसंच चालत हळूहळू पाण्यातून मार्गक्रमण सुरूच ठेवलं. सायन पुलावरून रेल्वे रूळावर असलेलं पाणी बघून अजून २-३ दिवस तरी काही गाड्या चालू होत नाही याची पूर्ण कल्पना आम्हाला आली. धारावीमधून जाताना पाहिलं, सगळ्या दुकानांत पाणी घुसलं होतं. इकडे स्त्रियांच्या पर्स खूप छान मिळतात, असं ऐकून होतो, आज त्या जिकडेतिकडे पाण्यात तरंगताना बघत होतो. वांद्रेला पाण्यातून येईपर्यंत ११ वाजत आलेले होते. सकाळी ७ वाजल्यापासून जे आम्ही चालत होतो, ते चालतच होतो. ना पाणी कमी झालं होतं, ना आम्हाला काही खायला प्यायला मिळालं होतं. आता मात्र पायात प्रचंड गोळे आले होते. पाण्यातून चालण्यासाठी खूप जोर काढावा लागत होता, आणि गेल्या ४-५ तासांमध्ये पायाची खूपच हालत झाली होती.

वांद्र्यावरून काय करायचं सुचेना. स्टेशनवर जाऊन काहीच उपयोग नव्हता. गाड्या सुरू होण्याची कोणतीच चिन्हं दिसत नव्हती. आता मनाशी विचार केला, की असंच लोकांबरोबर पुढे जाऊ. जिथपर्यंत शरीर साथ देईल तिथपर्यंत. वांद्र्याच्या थोडे पुढे आलो असेन, आमच्या बरोबर एक गरोदर बाई पाण्यातून चालत होती. साधारण ७वा महिना असेल. उंची कमी आणि पाणी पोटाच्यावर असल्याने तिची अवस्था खूपच गंभीर होती. तिच्या मैत्रिणीलाही काही सुचत नव्हते. मी आणि माझ्या मित्राने त्यांना सांगितले, की तुम्ही दुभाजकावरून चाला म्हणजे त्रास कमी होईल. मग एका बाजूने मी आणि दुसऱ्या बाजूने माझा मित्र त्यांचे हात धरून त्यांनी कसंबसं त्यावरून चालायला सुरूवात केली. आता पाणी ढोपराच्या खाली आल्याने त्यांचा त्रास कमी झाला होता. काही अजून लोकही मदतीला आले. मग हळूहळू करत आम्ही कसेबसे त्यांना वाकोला ब्रीजवर नेले. त्यांना तिकडेच थांबण्यास सांगितले, कारण त्यांची अवस्था खूपच बिकट होती. त्यांच्या काही मैत्रिणी तिकडेच भेटल्याने आम्ही त्यांना सोडून आता पुढची वाट चालू लागलो.

वाकोला ब्रीजवर वाहने अस्ताव्यस्त पडली होती. गाड्या तश्याच सोडून लोक निघून गेले होते. ब्रीज उतरल्यावर परत पाण्यातून प्रवास सुरू झाला. आता खरंच चालवत नव्हते. आधी इतक्या जोरात चालणारे आम्ही दोघेही थकून अक्षरशः एक-एक पाऊल मोजून मोजून पुढे टाकत होतो. इतकं सगळं झाल्यावर अजून पुढे काय वाढून ठेवलं होतं, हे आम्हाला सुद्धा माहित नव्हतं. आंतरदेशीय विमानतळापर्यंत आलो, तिकडे एका सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून चालत जाणाऱ्या लोकांना पाणी आणि एक पार्ले बिस्कीटचा पुडा मोफत देण्यात येत होता. त्या क्षणी माझ्यासाठी ते देवच होते. पाणी पिऊन ४ पार्लेची बिस्कीटं खाऊन त्यांचे मनापासून आभार मानले. निदान मुंबईत थोडीफार माणुसकी आहे, त्याचं दर्शन मला पहिल्यांदा झालं. माझ्या आयुष्यातील ती ४ बिस्कीटं सगळ्यात संस्मरणीय होती. अंधेरीपर्यंत चालत आल्यावर एक बेस्टची बस दिसली. ती स्टॉपवरून निघणार याचा अंदाज आम्हाला आला,  आणि दोघांनीही वीजेच्या वेगाने धावायला सुरूवात केली. अंगात होते नव्हते तितके बळ काढून कसंबसं त्या बसपर्यंत पोहोचलो व आत शिरलो. वाहन वाहकाने बस बोरीवलीपर्यंत जाईल असं सांगितलं. पण जिकडे पाणी चाकाच्या वर असेल, त्यापुढे जाणार नाही हेही सांगायला तो विसरला नाही. इतक्या कठीण प्रसंगात सुद्धा आपली ड्युटी प्रामाणिकपणे करणाऱ्या त्या बेस्ट कर्मचाऱ्यांचे आभार मनोमन मानले.

बस सुरू झाली. गोरेगाव येईपर्यंत बसमध्ये मुंगीलाही शिरायला जागा नव्हती. पण जो हात दाखवेल त्याला घेऊनच ती पुढे जात होती. अखेर तो क्षण आला.  दुपारी ४ वाजता मी मागठाणे डेपोला बसमधून उतरलो. सकाळी ७ वाजता सुरू झालेल्या प्रवासाची ती सांगता होती. माझा मित्र आधीच गोरेगावला त्याच्या घरी पोहोचला होता. चालायला अंगात त्राणच नसल्याने एका रिक्षाला थांबवून मी घरी पोहोचलो. काय काय उपद्व्याप करून मी घरी आलो, त्याचा विचार मी करत बसलो. आईने मस्तच जेवण बनवलं आणि मी त्या जेवणावर अगदी तुटून पडलो, जणू काही कित्येक दिवस मी काही खाल्लंच नव्हतं! या दोन दिवसांनी मला खूप काही शिकवलं, खूप काही अनुभव दिले. निसर्गाच्यापुढे मानव किती खुजा आहे, हेच त्याने त्या दिवशी मानवाला दाखवून दिले होते.

Thursday, 5 July 2012

२६ आणि २७ जुलै, २००५... दोन अविस्मरणीय दिवस..... विनीत वर्तक ©


२६ आणि २७ जुलै, २००५... दोन अविस्मरणीय दिवस..... विनीत वर्तक ©

२६ जुलै २००५ रोजी मुंबईत पावसाने अगदी ठाण मांडलं,  म्हणजे मनापासून तो गरजला आणि बरसला सुद्धा. १२ तासांच्या काळात मुंबईत जवळपास ९०० मिमी इतका पाऊस झाला. अनेक वर्षांचे विक्रम त्याने मोडीत काढले. याच दिवशी मी माझ्या ऑफिसमध्ये कामात होतो. साधारण दुपारी १ च्या सुमारास सगळ्यांना घरी जाण्यास सांगितले गेले. बसची वाट पाहण्यात १ तास गेला. आणि तो कोसळत होता, अगदी मुक्तपणे. भाभा अणुसंशोधन केंद्राचा परिसर हा इतका मोठा आहे, की आतमध्ये येण्याजाण्यासाठी बस लागतेच. दोन टोकांमध्ये जवळपास ८ किमी इतकं अंतर आहे. म्हणजे चालत जाण्याचा काही प्रश्नच नव्हता. बस ३च्या सुमारास आली. बोरिवलीला जाणारी पूर्ण ऑफिस सोडल्याने बसमध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. कसंबसं स्वतःला त्यात कोंबून बस भाभाच्या बाहेर आली, पण मोठं दिव्य तिकडेच होतं. मुळात भाभा अणुसंशोधन केंद्राची घरं ही डोंगर उतारावर आहेत आणि त्यामुळे अगदी छोट्या पावसातसुद्धा बाहेर पडण्याच्या जागेवर कमरेइतके पाणी होते, त्यात उतारामुळे त्यास जोरही खूप असतो. आज तर त्याचा दिवस होता. त्यामुळे पाणी प्रचंड साठलं होतं आणि तो बरसत होता. बस जेमतेम गेटपर्यंत आली तासाभरात. बाहेर कोसळणारा पाऊस बघून राहवेना आणि त्यात बसमध्ये इतकी गर्दी, की पाय ठेवायला सुद्धा जागा नाही. काचा बंद असल्याने आतमध्ये भरपूर घुसमट होत होती. मी आणि माझा एक मित्र जो गोरेगावला राहत होता, आम्ही दोघे बसमधून बाहेर पडलो, बस तिकडेच उभी.  चालत जाऊन पुढे बघितलं तर एका बसची पूर्ण चाकं बुडून बसमध्ये पाणी शिरत होतं आणि इंजिनमध्ये पाणी गेल्याने ती बंद पडली होती. मागे निदान २० बस उभ्या होत्या आणि त्यामागे आमची बस म्हणजे अजून तासभर तरी ती हालत नाही असं आम्ही सोप्पं गणित केलं, त्यात तो बरसत होताच अगदी कोसळत होता. आमचा एक मित्र कॉलनीमध्येच राहत होता, तो भेटला आणि म्हणाला, 'आज इकडेच राहा माझ्याकडे, आपण मस्त जेवण बनवू, पार्टी करू उद्या घरी जा'. पाऊस ज्याप्रमाणे कोसळत होता ते बघून उद्या काय ऑफीस उघडत नाही, हे आम्हाला कळून चुकलंच होतं. सगळ्यांत आधी एका दुकानातून घरी फोन केला. भाभामध्ये मोबाईलला परवानगी नसल्याने शेवटी पब्लिक फोनचा आसरा घ्यावा लागत होता. व्यवस्थित आहे असं घरी सांगून आजची रात्र इकडेच थांबणार आहे असे कळवले.

मित्राने तोपर्यंत रात्रीच्या जेवणासाठी सामुग्री आणायला सुरूवात केली, पण तोपर्यंत सगळंच बंद झालं होता. कशी बशी २४ अंडी मिळाली, म्हटलं आज यावर ताव मारू. २० पाव आणि २४ अंडी आणि आम्ही ३ जण म्हटलं, झकास होईल. त्याच्या घरी पोहोचलो आणि बघतो तर आमच्या ऑफिसमधले ९ जण आधीच त्याची वाट बघत थांबले होते. आता त्या २४ अंड्यांमध्ये १२ पोटं भरायची होती, कारण एकटा असल्याने त्याच्या घरात जास्ती खायला असं काहीच नव्हतं. जसजशी रात्र वाढू लागली, तसा पावसाचा जोर वाढला. आज तक, झी न्यूज, एनडीटीवी-वर बातम्या बघत पावसाने मुंबईची जी हालत करून टाकली होती, ते बघत होतो. तेव्हा कुठे माहीत होतं, ही तर सुरूवात आहे, खरा पाऊस तर अजून यायचा आहे. जेवायला बसणार तितक्यात अजून ४ मित्र त्याच्या घरी आले. आता मात्र पंचाईत होती. 16 जणांनी त्या २४ अंड्यांवर आणि १२ पावांवर कधीबशी भूक भागवली. रात्री कधी झोपी गेलो ते कळलंच नाही. तो अजूनही बरसत होता.

सकाळी लवकर उठून मी आणि माझा गोरेगावचा मित्र लगेच निघालो. पावसाचा जोर कमी झाला होता. रिमझिम सरी चालू होत्या. २७ जुलै २००५ ची ती सकाळ होती. त्याच्या घरून भाभाच्या गेटवर आलो.  सगळीकडे सामसूम पाणी कमी झालं होतं. पण जाण्यासाठी काही वाहन दिसेना. तुरळक लोक चालत होती. मित्राला म्हटलं, आता हाच उपाय इकडे थांबून काही होणार नाही आपण हायवे-ला जाऊ, तिकडे काही ना  काही मिळेल. आम्ही चालत चालत हायवे-ला आलो. बस थांब्याजवळ एखाद्या तरी बसची वाट बघत आमच्यासारखी २५ एक मंडळी होती. तिकडे १५ मिनिटे थांबलो, पण एकही बस थांबेना. शेवटी लांबून एस.टी. येताना दिसली. सर्वांनी ठरवलं, की कसंही करून थांबवायची. त्याप्रमाणे पूर्ण रस्त्यात मानवी साखळी करून उभे राहिलो, आणि आम्ही मध्ये म्हणजे त्याने थांबवली नाही तर आमची विकेट. पण हा असला प्रकार बघून त्याने बस थांबवली. सगळे कसेबसे      चढलो, अक्षरशः कोंबलो. मी आणि मित्र वरती बसलो, म्हणजे बसच्या टपावर. बस जेमतेम अर्धा किमी पुढे गेली, आणि वाहनांची कोंडी झालेली दिसली.  टपावर असल्याने आम्हाला लगेच अंदाज आला, की नजर जाईल तिकडे गाड्या दिसत होत्या.  म्हणजे त्या टपावर बसून राहण्यात काहीच अर्थ नव्हता. आम्ही उतरून चालू लागलो. आर.के. पर्यंत व्यवस्थित चालत आलो. त्यानंतर खरी परीक्षा चालू झाली. पुढे पूर्ण रस्त्यावर कमरेइतके पाणी भरले होते. सगळी वाहने वेडीवाकडी  अडकून पडली होती. कोणाला काहीच कळत नव्हते. मी आणि मित्राने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्या पाण्यातून वाट काढत आम्ही पुढे जाऊ लागलो. आमच्याबरोबर काही इतर जणही  चालू लागले. आधी थोडं विचित्र वाटत होतं, कारण ते घाण पाणी आणि त्यातून आपण चालतो आहोत, वरून पाऊस. सगळं कसं विचित्र होतं, पण दुसरा पर्याय समोर दिसत नव्हता. ऑफिसची बॅग डोक्यावर आणि एका हाताने स्वतःला सावरत पाण्याचा अंदाज घेत रस्त्याच्या मधून चालत होतो. गटाराची  झाकणं उघडी केल्याने खूप सांभाळून चालावं लागत होतं. एक दोन ठिकाणी आम्हाला कळल्यावर तिकडे काठ्या उभ्या केल्या, जेणेकरून मागे चालत येणाऱ्या लोकांना अंदाज येईल. हळूहळू आमचा एक १५-२० जणांचा ग्रुप झाला चालता चालता, यात २-३ स्त्रिया ज्या आमच्यासारख्या अडकल्या होत्या. काही कॉलेजची मुलं आणि असेच घराकडे जाणारे लोक होते. चेंबूरपासून हळूहळू चालत येऊन प्रियदर्शनीपर्यंत आलो, सगळा हाय-वे ठप्प. सगळ्या गाड्या वेड्यावाकड्या. एका गाडीमध्ये एक माणूस अडकला होता. रात्री एसी लावून गाडीत झोपला, पण जसं पाणी गेलं इंजिनमध्ये, गाडी बंद आणि ऑटो लॉक असल्याने दरवाजे खिडक्या बंद. आतून त्याला काहीच करता येत नव्हते. शेवटी माझ्याबरोबर असलेल्या लोकांनी दगड शोधायला सुरूवात केली.  बाहेरून पाणी असल्याने काच फुटत नव्हती. आता दगड लागणारच होता, पण शोधावा कुठे? मग सगळे लोक रस्त्याच्या कडेला माणसाची साखळी करून गेले व एक मोठा दगड कसाबसा हातानी उचलून आणला आणि दरवाजाची काच फोडली. बिचारा आतमध्ये घुसमटला होता, बाहेर येताच कोणीतरी त्याला पाणी दिलं, त्याने आभार मानले आणि तो मार्गस्थ झाला. सकाळपासून पोटात पाण्याचा एक थेंबही नव्हता. पण आजूबाजूच्या लोकांची अवस्था बघून मला तहान लागली आहे, हे मी विसरून गेलो होतो.... क्रमश: