द बॉस... विनीत वर्तक ©
गेल्या आठवड्यात भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होते. तिकडे ऑस्ट्रेलियातील लोकांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासह भाग घेतला. त्या कार्यक्रमात बोलताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी भारताच्या पंतप्रधानांचा उल्लेख 'द बॉस' म्हणून केला. या उल्लेखाची चर्चा नुसती भारतात नाही तर सद्या संपूर्ण जगात होते आहे. अगदी आपल्या शत्रुदेशात म्हणजेच पाकिस्तानात सुद्धा 'द बॉस' या उल्लेखावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक लोकांच्या मते भारताचा जागतिक स्तरावर वाढलेला दबदबा आणि भारताच्या पंतप्रधानांची जगभरात वाढती लोकप्रियता याचं हे एक प्रतीक आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांनी 'द बॉस' हा उल्लेख करताना एका रॉकस्टार चा उल्लेख केला होता. त्याच नाव आहे 'ब्रुस स्प्रिंगस्टीन'. या ब्रुस स्प्रिंगस्टीन ला सुद्धा जेवढं वलय आणि लोकप्रियता नाही त्यापेक्षा कैक अधिक पटीने भारताच्या पंतप्रधानांचे वलय आणि लोकप्रियता जास्त आहे. भारतात राहणाऱ्या अनेकांना मुळात हा ब्रुस स्प्रिंगस्टीन कोण हे माहित नसेल. तर ब्रुस स्प्रिंगस्टीन हा एक अमेरिकन गायक, संगीतकार आहे. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत त्याने २१ अल्बम काढले आहेत. एकट्या अमेरिकेत त्याच्या अल्बम च्या विक्रीचा आकडा ७१ दशलक्षापेक्षा जास्त आहे. तर जगभरात त्याच्या अल्बम च्या तब्बल १४० दशलक्ष प्रती विकल्या गेल्या आहेत. या ब्रुस स्प्रिंगस्टीन ला आजवर २० ग्रॅमी पुरस्कार, २ गोल्डन ग्लोब पुरस्कार तर एकदा ऑस्कर (एकेडमी) पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. २०१३ मधे अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्रपती बराक ओबामा यांनी त्याचा स्वातंत्र्याचे राष्ट्रपती पदक (Presidential Medal of Freedom) देऊन सन्मान केला आहे. (Presidential Medal of Freedom हा पुरस्कार अमेरिकेतील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.) २०२३ मधे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी राष्ट्रीय कला पदक (National Medal of Arts) देऊन त्याचा सन्मान केला आहे. इतक्या प्रतिभावान कलावंताला जे जमलं नाही ते एका राजकारण्याला लाभलं त्याचसाठी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी भारताच्या पंतप्रधानांचा उल्लेख 'द बॉस' असा केला.
द बॉस हा उल्लेख फक्त प्रसिद्धीसाठी नव्हता हे त्याच कार्यक्रमाच्या काही दिवस आधी घडलेल्या घटनांवरून स्पष्ट होते. ऑस्ट्रेलियात उतरण्यापूर्वी भारताचे पंतप्रधान पॅसिफिक महासागरातील पापुआ न्यू गिनी (PNG) या देशाला भेट दिली. तिकडे त्यांच रेड कार्पेट स्वागत करण्यात आलं. पण त्याहीपेक्षा चर्चेचा विषय ठरला तो या देशाचे पंतप्रधान जेम्स मॅरापे यांनी चक्क विमानतळावर भारताचे पंतप्रधान विमानातून खाली उतरत नाही तोच भारतीय संस्कृती प्रमाणे त्यांच्या पायाला अगदी वाकून केलेला स्पर्श. ही घटना फक्त भारतात नाही तर संपूर्ण जगभर चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरलेली आहे. आज एका वेगळ्या देशातून हे लिहताना इथल्या लोकांमध्ये ही ती मला जाणवली म्हणून अधिक चांगल्या पद्धतीने या घटनेतुन गेलेला संदेश आणि त्याच महत्व मला जास्ती आहे. एका देशाचा प्रमुख दुसऱ्या देशाच्या प्रमुखाचे वाकून चरणस्पर्श करतो ही घटना माझ्या उभ्या आयुष्यात मी कधी बघितलेली नाही. राजकारणापलीकडे आपसूक केली गेलेली ही कृती आहे म्हणून त्याच महत्व जास्त आहे.
हीच घटना जर भारताच्या पंतप्रधानांनी दुसऱ्या कोणासाठी केली असती तर भारतात हाहाकार माजवला गेला असता. भारत झुकला, भारताचे पंतप्रधान झुकले, भारताची इज्जत, इभ्रत सगळी धुळीला मिळवली अश्या पद्धतीचे लेख अक्षरशः सर्व मिडिया ने लिहले असते. कारण कोणासमोर आपलं शिर झुकवणं हा आपला अपमान मानणारे अनेक आहेत. पण हिंदू संस्कृतीची ती एक ठेवणं आहे जिकडे एखाद्या आपल्यापेक्षा वयाने, अनुभवाने, स्थानाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीला आदर, सन्मान देण्याची एक पद्धत आहे. त्यामुळेच जेम्स मॅरापे यांची कृती ही राजकारणापलीकडे आहे. एक भारतीय म्हणून भारताच्या पंतप्रधानांना असा आदर, मान सन्मान मिळताना बघणं सुखदायक आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान 'द बॉस' म्हणाले ते या दृष्टिकोनातून सुद्धा. या गोष्टी विकत, धाकातुन किंवा जाणीवपूर्वक मागून मिळत नाहीत तर त्या आतून याव्या लागतात. त्या येण्यासाठी तुमच्या व्यक्तिमत्वाची उंची तितकी असली पाहिजे. यासाठीच भारताचे पंतप्रधान द बॉस ठरतात.
जपान इथे झालेल्या जी ७ गटांच्या परिषदेला भारताचे पंतप्रधान विशेष निमंत्रक म्हणून उपस्थित होते. जी ७ गटाचा भाग नसताना पण भारताला जपान ने हा सन्मान दिला होता. तिकडे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बायडेन हे स्वतः क्वाड सदस्यांची मिटिंग सुरु असताना भारताच्या पंतप्रधानांन जवळ आले. त्यांनी भारताच्या पंतप्रधानान कडे त्याच्या हस्ताक्षराची मागणी केली. जगातील सगळ्यात शक्तिशाली राष्ट्राचा प्रमुख भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ताक्षराची मागणी करतो यातूनच भारताच्या पंतप्रधानांचा आणि भारताचं जागतिक स्तरावर वाढलेलं महत्व अधोरेखित होते. प्रश्न एका हस्ताक्षराचा अथवा मागणीचा नाही तर जगातील सर्व लोक लाईव्ह बघत असताना कॅमेरासमोर येऊन दाखवलेल्या गेस्चर (हवाभाव) चा. या गोष्टी पडद्यामागे ही करता आणि सांगता आल्या असत्या पण त्या पडद्यासमोर करण्यामागे खूप काही सुप्त हेतू लपलेले असतात. बायडेन यांची घसरत चाललेली अमेरिकेतील प्रतिमा सुधारण्यासाठी बायडेन यांना पण नाईलाजाने भारताच्या पंतप्रधानांच्या लोकप्रियतेचा आधार घ्यावा लागलेला आहे. हे यातून स्पष्ट होते आहे. भारतीय समुदाय हा अमेरिकेतील एक मोठा समुदाय असून त्यांची मते आपल्या बाजूने वळवण्यासाठी केलेला एक प्रयत्न असला तरी यातून भारताच्या पंतप्रधानांची जनमानसात असलेली प्रतिमा संपूर्ण जगासमोर अधोरेखित झाली आहे. ती प्रतिमा नक्कीच द बॉस ची आहे.
गेल्या आठवड्याभरात घडलेल्या अनेक लहान मोठ्या घटना या एकाच गोष्टीकडे सूतोवाच करत आहेत ते म्हणजे भारताचं आंतरराष्ट्रीय पटलावर वाढलेलं वजन आणि भारताची बदललेली प्रतिमा. भारता बद्दल आपण काय विचार करतो आणि त्याने काय फरक पडेल याची नोंद जगाने घ्यायला सुरवात केलेली आहे. अर्थात भारतात हे समजण्या एवढी कुवत किती लोकांची आहे आणि द्वेषाचा पिवळा चष्मा घालून स्वतःला सहिष्णू म्हणणाऱ्या किती लोकांना या गोष्टी पटतील याबद्दल शंका आहे.
तळटीप:- मी कोणत्याही पक्षाचा समर्थक अथवा विरोधक नाही. ना कोणत्या पक्षाच प्राथमिक सद्सत्व माझ्याकडे आहे. परदेशात असताना जाणवलेल्या भारता बद्दलच्या गोष्टी फक्त शब्दांकन केलेल्या आहेत.
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.