'टर्निंग पॉईंट'... विनीत वर्तक ©
आपण आजवर शिकलो ते सगळं चुकीचं होतं असं कोणी म्हणालं तर???
सध्या जगातील सर्वच खगोल आणि भौतिक शास्त्रज्ञ या गोष्टीचा अनुभव घेत आहेत. कारण जे समोर आलं आहे ते आपल्या विश्वाबद्दलच्या संकल्पना मुळापासून हादरवून टाकणारं आहे. हे मी नाही सांगत तर जगातील अतिशय नावाजलेले वैज्ञानिक आपल्याला पुन्हा विज्ञान लिहावं लागेल असं म्हणायला लागले आहेत.
याला कारण आहे मानवाच्या तंत्रज्ञान प्रगतीने विश्वाबद्दलच्या आपल्या माहितीला दिलेला छेद. हबल दुर्बीण अवकाशात सोडल्यानंतर तिने आपल्याला विश्वातील अनेक रहस्यांचा उलगडा करून दिला. पण तरीही अनेक प्रश्न हे अनुत्तरीत होते. त्याचा मागोवा घेण्यासाठी मानवाने २०२१ मधे जेम्स वेब दुर्बीण अवकाशात पाठवली. हबल पेक्षा तब्बल १०० पट ताकदवान असणारी ही दुर्बीण विश्वाची जडणघडण समजून घ्यायला आपल्याला मदत करेल हे आपल्याला माहीत होतच पण जेम्स वेब ने नुकत्याच शोध लावलेल्या काही गोष्टींमुळे आपल्या विश्वाबद्दलच्या संकल्पनेलाच मुळी मुळापासून हादरे बसले आहेत.
आपण आजवर शिकत आलो अथवा शिकवलं गेलं की विश्वाची निर्मिती १३.८ बिलियन वर्षापूर्वी झाली. तिकडून ते आजच्या क्षणापर्यंत आपण विश्वाच्या प्रवासाचं एक मॉडेल तयार केलं. अमुक एक वर्षांनी तारे तयार झाले, दीर्घिका तयार झाल्या, ग्रह तयार झाले, धूमकेतू, लघुग्रह, कृष्णविवर, ते सुपरनोव्हा आणि पल्सार अश्या सगळ्याच गोष्टी कश्या पद्धतीने आणि कोणत्या वेळी विश्वात निर्माण झाल्या याच एक सर्वसाधारण मॉडेल आपल्या संपूर्ण विश्वाच्या आकलनासाठी तयार केलं गेलं. त्याच मॉडेल च्या आधारे आपण अनेक नियम, ठोकताळे आणि गणित मांडलं. आजवर ते बरोबर ही येत होतं. त्यामुळेच आपल्याला असा ठाम विश्वास बसला की आपण विश्वाची मूलभूत संरचना समजलो आहोत. नक्कीच काही अनुत्तरित प्रश्न नक्कीच होते पण तरीही एक अंदाज आपल्याला होता.
याच खगोल शास्त्रातील मॉडेल ला जेम्स वेब ने हादरे दिले आहेत. जेम्स वेब ने टिपलेल्या काही दीर्घिकांन बद्दलची माहिती जेव्हा सार्वजनिक करण्यात आली त्या नंतर खगोल विश्वात भूकंपाचे धक्के बसायला सुरवात झाले आहेत. सामान्य माणसाच्या मनात येईल की दीर्घिका शोधण्यासाठी तर जेम्स वेब दुर्बीण बनवली मग तिने जर खूप दूरवरच्या दीर्घिका ज्या आत्तापर्यंत आपल्याला दिसल्या नव्हत्या त्या शोधल्या तर त्यामुळे नाकी काय बिनसलं. काय बिनसलं हे समजून घेण्यासाठी थोडक्यात विश्वाचं मॉडेल समजून घेऊ.
विश्वाच्या मॉडेल मधे बिग बँग झाल्यानंतर आपली अशी धारणा होती की पहिले तारे बनायला आणि पहिल्या दीर्घिका बनण्याची किंवा कृष्णविवर बनण्याची सुरवात साधारण १ ते २ बिलियन वर्षानंतर झाली. साधारण १ ते २ बिलियन वर्षात विश्वात लाईट कुठेच नव्हता सगळं काही अंधारमय होतं त्यालाच आपण डार्क एज असं नाव दिलं. आता घोळ असा झाला आहे की जेम्स वेब ने चक्क या डार्क एज च्या काळात अस्तित्वात असणाऱ्या दीर्घिका शोधल्या आहेत. त्या पण एक नाही तर ५-६ दीर्घिका एकत्र नांदत आहेत. त्यातील काही तर आपल्या मिल्की वे आकाशगंगेपेक्षा मोठ्या आहेत. या दीर्घिका बिग बँग नंतर ३०० ते ५०० मिलियन वर्षात अस्तित्वात आहेत. यांच्या सोबत एक अत्यंत छोटी दीर्घिका पण शोधली आहे. ती लहान असली तरी प्रचंड वेगाने ताऱ्यांची निर्मिती करत आहे. आपली मिल्की वे मधे प्रत्येक वर्षी १-२ नवीन तारे जन्माला येतात तर इकडे या दीर्घिकेत असलेल्या गॅसेस पासून १००% तारे निर्माण होत आहेत. त्यांच प्रमाण मिल्की वे पेक्षा कित्येक पटीने जास्त आहे.
या सगळ्या शोधामुळे जगातील सर्वच वैज्ञानिक हादरले आहेत कारण मुळातच विश्व संकल्पनेच्या आपल्या माहितीला याने हादरे बसले आहेत. जर का डार्क एज च्या काळात इतक्या मोठ्या दीर्घिका आणि त्याच सोबत बिलियन आणि बिलियन तारे अस्तित्वात असतील तर मुळात बिग बँग झालं तरी असेल का? बिग बँग ही संकप्लना तर चुकीची असेल तर आपल्या सगळ्याच थेअरी चुकीच्या ठरतील. बरं या दीर्घिकांच्या मध्यभागी भले मोठे कृष्णविवर ही आढळून आलेली आहेत. मग इतकी ऊर्जा आणि त्यांची निर्मिती कशी झाली असेल? कदाचित ते बिग बँग च्या पूर्व जन्मातील तर नाहीत न? जर असतील तर याचा अर्थ समांतर विश्व अस्तित्वात आहे. एकूणच एक ना अनेक प्रश्न जगातील सर्वच वैज्ञानिकांसमोर उभे ठाकले आहेत. ज्याची उत्तर शोधण्यासाठी पुन्हा आपल्याला खगोल शास्त्राच्या बेसिक पर्यंत जावं लागणार आहे.
एकूणच काय तर जेम्स वेब ने लावलेला शोध हा संपूर्ण खगोल आणि भौतिक शास्त्रासाठी टर्निंग पॉईंट ठरलेला आहे. येत्या काळात याच प्रश्नांची उत्तर शोधणाऱ्या वैज्ञानिकांना नोबेल पुरस्कार मिळाला तर मला आश्चर्य वाटणार नाही. तूर्तास बघूया आगे आगे क्या होता है!...
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.