Monday, 10 April 2017

चेतन चिता... विनीत वर्तक
चेतन चिता हे कोणत्या क्रांतिवीर सारख्या चित्रपटातील नाव नाही तर एका शूरवीर सैनिकाच नाव आहे. मृत्यूला सुद्धा वाट बघयला लावणाऱ्या ह्या जाबांज सैनिकाने एक अतुल्य असा आदर्श भारतीयांपुढे ठेवला आहे. देशभक्तीच ह्याहून ज्वलंत उदाहरण दुसर नसेल. फुकटचा अभिमान बाळगणाऱ्या सर्वांनीच देशभक्ती काय असते ते चेतन चिता ह्यांच्याकडे बघून शिकावं.
चेतन चिता वय वर्ष ४५. हे सी. आर. पी. एफ. च्या ४५ व्या बटालियन चे कमांडिंग ऑफिसर आहेत. १४ फेब्रुवारी २०१७ रोजी पाराय मोहल्ला एनकाउन्तर ऑफ हाजीन एरिया. लष्कर ए तयब्बाच्या एका आतंकवाद्याने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात ३ स्युकीरीटी लोक धारातीर्थी पडले व ८ लोकांना गंभीर जखमा झाल्या ज्यात एका नागरिकाचा समावेश होता. अश्या बिकट परिस्थितीत आपल्या जीवाची तमा न बाळगता चेतन चिता ह्यांनी अत्युच्य देशभक्ती आणि लीडर प्रमाणे त्याच्यावर विरुद्ध दिशेने हल्ला केला. त्यांच्या शरीरात तब्बल ९ गोळ्या घुसल्या. डोके, हात , पोट, डोळे अश्या शरीराच्या अतिशय महत्वाच्या ठिकाणी गोळ्या लागून सुद्धा एका लढवय्या प्रमाणे त्यांनी तब्बल १६ राउंड अतिरेक्याच्या दिशेने फायर केले.
चित्रपटात अनेकवेळा गोळ्या लागून सुद्धा आपण हिरोला खलनायकाच्या दिशेने गोळ्या घालताना किंवा त्याचा जीव घेताना अनेक चित्रपटात बघितल असेल. पण खऱ्या आयुष्यात एका फटाक्याने घाबरणाऱ्या आपल्या सारख्या पोकळ देशाभिमान मिरवणाऱ्या माणसांना खऱ्या गोळीची जखम काय कळणार? कारण ती कळायला तसा ज्वाज्वल्य अभिमान आपल्या नसानसात असावा लागतो. नुसता अभिमान नाही तर तस काळीज हि असावं लागते. एका वेळी तब्बल ९ गोळ्या शरीरात घुसलेल्या असताना जीवाची पर्वा न करता फक्त देशासाठी आणि फक्त देशासाठी शेवटच्या श्वासापर्यंत अतिरेक्याच्या दिशेने गोळी चालवणारे चेतन चिता सारखे ऑफिसर आज देशाची सुरक्षा करतात म्हणून आपण आज शांत झोपू शकतो.
तब्बल २ महिने कोमात राहिल्यावर मृत्यूला परत पाठवत ह्या बहादूर सैनिकाने पुन्हा एकदा डोळे उघडले ते देशभक्ती साठीच. तोंडातून शब्द काढण्याची ताकद आल्यावर एक डोळा गमावल्यावर सुद्धा त्यांच्या तोंडावर हास्य होत. पुन्हा एकदा देश रक्षणासाठी आपल्या कामावर परतण्याची त्यांना उत्सुकता लागली आहे. जेव्हा मिनिस्टर ऑफ स्टेट होम आणि भारतीय आर्मी चे चीफ ह्यांनी भेट दिली असता त्यांनी काढलेले उद्गार त्यांच्या अतूट देशप्रेमाची साक्ष देतात. “I feel I have contributed something to the nation,"
हे कुठून येत असेल? त्यांच्याविषयी वाचताना आणि आता लिहताना पण डोळ्यात पाणी येते कि आजच्या स्वार्थासाठी जगणाऱ्या गर्दीत असे हि काही लोक आहेत. ज्यांच्यासाठी स्वार्थाच्या कक्षाच वेगळ्या असतात. आपल्या सारखी कुत्सित मनाची कुपमंडूक माणस अश्या लोकांना कधीच समजू शकत नाही. त्यांच्या प्रमाणे त्याची अर्धांगिनी पण ह्या सर्व काळात त्यांच्या मागे ठामपणे उभी होती. डॉक्टरांच्या मते आपल्या नवऱ्याला ९ गोळ्या लागलेल्या अवस्थेत आणि त्या गोळ्यांनी केलेल्या जखमा बघून कोणत्याही बायकोने आशाच सोडली असती. पण चेतन परत येणारच ह्या त्यांच्या आत्मविश्वासाने एम्स च्या डॉक्टरांना एक नवी उभारी दिली. न्युरोलोजीस्ट, प्लास्टिक सर्जन, आय स्पेशालीस्ट अश्या सगळ्या एम्स च्या टीम ने आपल कौशल्य पणाला लावत मृत्युच्या दाढेतून चेतन चिता ह्यांना पुन्हा बाहेर आणल.
एक सुखी कुटुंब, चांगली नोकरी, चांगला हुद्दा असताना फक्त देशासाठी जीवाची बाजी लावत अतिरेक्यांशी ९ गोळ्या लागलेल्या असताना सुद्धा लढाई करणाऱ्या शूरवीर अधिकाऱ्याला माझा साष्टंग दंडवत. हिरो म्हणजे काय ह्याची व्याख्या जर सांगायची झाली तर मला वाटते चेतन चिता सारखे अधिकारी. अश्याच अधिकाऱ्याला तोलामोलाची साथ देणारी त्यांची सहचरणी, कुटुंब आणि एम्स चे डॉक्टर सगळ्यांनाच कडक स्याल्युट. चेतन चिता ह्यांना आज हॉस्पिटल मधून घरी जाण्याची मुभा मिळाली. पुन्हा एकदा आपण त्याच आवेशात, जोशात देशाच्या रक्षणासाठी लवकरात लवकर कामावर रुजू होऊ अस एक नवीन लक्ष्य ठेवत चेतन चिता ह्यांनी देशप्रेमाचा एक अत्युच्य आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. चेतन चिता आणि त्यांच्या सारख्या अनेक देशप्रेमाने झपाटलेल्या सैनिकांसाठी माझा हा लेख समर्पित. जय हिंद.