'ऑटिसम स्पेक्ट्रम' ची मालिका... विनीत वर्तक ©
मनुष्य हा समाजभिमुख सजीव आहे. त्यामुळेच त्या समाजात वावरण्याचे काही मापदंड ठरलेले आहेत. जेव्हा कोणी हे मापदंड सोडून वावरतो तेव्हा समाजाच्या पठडीत तो बसत नाही. त्याला वेगवेगळी लेबल लावली जातात. त्याला समाजाकडून वेगळ्या दर्जाची वागणूक मिळते, त्या व्यक्तीला वेगळं असल्याची पदोपदी जाणीव करून दिली जाते. हे मापदंड सोडण्याची कारणं अनेक आहेत काही स्वतःहून ओढवून घेतलेली तर काही निसर्गतः मिळालेली. त्यातलं एक प्रमुख कारण म्हणजे 'ऑटिसम स्पेक्ट्रम'
ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (ASD) हा न्यूरोलॉजिकल आणि डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे जो लोक इतरांशी कसे संवाद साधतात, शिकतात आणि वागतात यावर परिणाम करतात. यातील डिसऑर्डर हा शब्द आता काढून टाकण्यात आला आहे. कारण अनेक डॉक्टरांच्या मते ही डिसऑर्डर नसून आपल्या मेंदूच्या न्यूरॉन्स च्या जडणघडणीत आलेली अडचण आहे. त्यामुळे ऑटिस्टिक असलेल्या लोकांना समाजाच्या ठरवलेल्या साच्यात संवाद साधण्यासाठी, मिसळण्यासाठी अडचणी येतात. ऑटिझम स्पेक्ट्रम पहिल्यांदा समाजाच्या पटलावर मांडण्याचं श्रेय जर्मन मानसोपचारतज्ज्ञ युजेन ब्ल्यूलर यांना जाते. १९११ साली त्यांनी पहिल्यांदा ऑटिझम हा शब्द अश्या लोकांसाठी समोर आणला. ऑटिझम या शब्दाचा जर्मन अर्थ होतो 'आतलं आयुष्य'. १९११ ते आत्तापर्यंत ऑटिझम वर खूप संशोधन झालं आहे. ऑटिझम लोक योग्य उपचारांनी आणि त्यांना समजून घेणतल्यावर समाजाचा भाग होऊ शकतात हे आता सिद्ध झालं आहे. एकेकाळी वेड्यात गणल्या गेलेल्या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खूप प्रयत्न झाले आहेत आणि होत आहेत.
असं असलं तरी समाजाच्या मापदंडाबाहेर कोणीतरी वेगळं असलं तर त्याला सामावून घेण्याचा विचार किंवा प्रगल्भता आजही समाजात किंवा जे लोक स्वतःला प्रगल्भ मानतात त्यांच्यात रुजलेली नाही हे सत्य आहे. आजही ऑटिझम असलेल्या व्यक्तीकडे बघण्याचे समाजाचे ठोकताळे वेगळे आहेत. त्यांना समाजात स्थान देण्याचे मापदंड वेगळे आहेत. ते कोणीतरी वेगळे आहेत म्हणून त्यांची सहानभूती ठेवण्याची मानसिकता आजही समाजात मोठ्या प्रमाणावर आहे. एकट्या भारतात ३ मिलियन ( ३० लाख ) लोकं आजही ऑटिसम स्पेक्ट्रम चा शिकार झालेली आहेत. त्यांना समाजाच्या मख्य प्रवाहात आणण्यासाठी, एक जबाबदार नागरीक म्हणून योग्य तो सन्मान देण्यासाठी होणारे प्रयत्न हे खूप थोडे आहेत.
नक्की ऑटिसम स्पेक्ट्रम काय आहे? ऑटिसम स्पेक्ट्रम असलेली लोक कश्या पद्धतीने व्यवहार करतात? त्यांची आपल्या नॉर्मल असणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा असते? ऑटिसम स्पेक्ट्रम लोक काय करू शकतात? अश्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला एकाच ठिकाणी जाणून घ्याची असतील किंवा निदान अश्या लोकांना समजून घेण्याची मानसिक तयारी करायची असेल तर एक सुंदर मालिका सध्या नेटफ्लिक्स वर प्रसारित होत आहे. ज्याचं नाव आहे 'Extraordinary Attorney Woo'.
कोरियन सिरीज मला का जवळच्या आहेत तर त्याच उत्तर ही एक मालिका आहे. एक असा विषय घेऊन ती समोर आली आहे की हा लेख लिह्ण्यापासून स्वतःला रोखू शकलो नाही. ऑटिसम स्पेक्ट्रम असलेली एक साधारण व्यक्ती जेव्हा वकील बनून कोर्टात केस लढते तेव्हा तिला समाजाने दिलेली वागणूक, समाजातून होणारी अवहेलना, काहीतरी वेगळं म्हणून होणार तिरस्कार, थट्टा, अपमान आणि एकूणच समाजाकडून मिळणारी दोन्ही टोकाची वागणूक. मग ती चांगल्या बाजूने असो वा वाईट बाजूने. त्यातून ऑटिसम स्पेक्ट्रम असणारी व्यक्ती कसा प्रवास करते हे सगळं जेव्हा हळुवार उलगडत जाते. तेव्हा आपण मंत्रमुग्ध झालेलो असतो.
आय.एम.डी.बी. वर सध्या ९.६ इतकं प्रचंड मानांकन असलेली ही मालिका मला प्रत्येक एपिसोड ची वाट बघायला लावणारी ठरलेली आहे. विषय साधा पण त्याला उत्तम सादरीकरणाची जोड मिळाली, उत्तम अभिनयाची साथ मिळाली तर एक असा कलाविष्कार समोर येतो जो बघताना हळूच डोळे ओले पण करतो, आपल्या ओठांवर स्मित हास्य पण आणतो आणि त्याच वेळी ऑटिसम स्पेक्ट्रम सारख्या समाजातील एका दुर्लक्षित विषयाचे अनेक कांगोरे आपल्या समोर उलगडून पण ठेवतो. हे सगळं करत असताना एक काहीतरी चांगलं बघितल्याचा अनुभव ही देऊन जातो. या मालिकेतील Woo Young-woo हे पात्र साकारणारी Park Eun-bin ही एका ऑस्कर साठी नक्कीच पात्र आहे. ज्या पद्धतीने तिने ऑटिस्टिक वकील सादर करण्यासाठी जीव ओतला आहे ते शब्दांपलीकडे आहे.
अजूनही या मालिकेचे ५ एपिसोड उपलब्ध आहेत. पण त्यातही या मालिकेने बाजी मारली आहे. कोरियन मालिका या नेहमी १६ भागांच्या असतात. त्याला ही मालिका ही अपवाद नाही. प्रत्येक आठवड्याला याचा एक ते दोन एपिसोड नेटफ्लिक्स वर उपलब्ध होणार आहेत. ऑटिसम स्पेक्ट्रम समजून घ्यायचं असेल तर ही मालिका चुकवू नका. यात सगळ्याच गोष्टी दाखवल्या आहेत असं नाही. पण ज्या सुंदर पद्धतीने मालिका समाजातील कळत- नकळत होणाऱ्या गोष्टींना स्पर्श करते तो भाग जस्ट अमेझिंग आहे. एक प्रसंग नक्की इकडे सांगेन की जेव्हा याच ऑटिसम स्पेक्ट्रम असलेल्या वकिलाकडे ऑटिसम स्पेक्ट्रम असलेल्या व्यक्तीने खून केला असल्याची केस येते आणि जेव्हा कोर्टात यावर दावे प्रतिदावे सुरु असतात. तेव्हा ऑटिसम स्पेक्ट्रम म्हणून त्या व्यक्तीच्या शिक्षेत कमी करण्यात यावी असा एक दावा होतो. त्यावेळेला प्रतिदावे करताना वकील सांगतो की एकीकडे तुम्ही ऑटिसम स्पेक्ट्रम असलेल्या व्यक्तीला एक हुशार वकील म्हणून मान्यता देतात आणि त्याचवेळी ऑटिसम स्पेक्ट्रम असलेल्या व्यक्तीला शिक्षा कमी करण्यासाठी कोर्टाला सांगता. पुढे काय होतं ते मालिकेत बघणं उत्तम पण या निमित्ताने मला हे सांगायचं आहे की एखाद्या मालिकेत अश्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण प्रत्यक्ष अनुभवू किंवा एक ऑटिसम स्पेक्ट्रम असलेली व्यक्ती अनुभवेल. तेव्हा त्या व्यक्तीची मानसिकता काय असेल? त्या व्यक्तीच्या जवळच्या लोकांना काय वाटेल? एकूणच समाज अश्या वेळेस काय बघतो? अश्या सर्व गोष्टींना स्पर्श करणारे अनेक प्रसंग या मालिकेत आहेत.
या मालिकेच्या निमित्ताने ऑटिसम स्पेक्ट्रम सारख्या विषयावर अभ्यास करण्याची आणि अजून जाणून घेण्याची इच्छा मला व्यक्तिशः झाली. या मालिकेमुळे अश्या व्यक्तींकडे माझ्या बघण्याच्या दृष्टिकोनात नक्की बदल होईल. कुठेतरी त्यांना समजून घेण्याची एक पायरी वर चढण्याची संधी किंवा शिकवण या मालिकेमुळे मला मिळते आहे. रोज उठून सासू- सुनांच्या आणि एकेमकांच्या कट कारस्थानात धन्य पावणाऱ्या फालतू मराठी आणि हिंदी मालिका बघण्यापेक्षा कोरियन मालिका मला खूप जवळच्या वाटतात. त्यांची भाषा समजत नसली तरी नुसत्या अभिनयाने विषय पोहचवण्याची ताकद, विषयातील नावीन्य आणि त्याच सादरीकरण या बाबतीत त्या खूप वरच्या दर्जाच्या आहेत. ज्यांना कोणाला ऑटिसम स्पेक्ट्रम जाणून घ्यायचं असेल तर या विषयावर आलेली ही मालिका चुकवू नका.
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:
Post a Comment