Thursday 23 February 2023

झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये... विनीत वर्तक ©

'झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये'... विनीत वर्तक ©

गेल्या काही महिन्यांपासून खरे तर काही वर्षांपासून जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा बदलायला सुरवात झाली आहे. भारत सरकारने घेतलेल्या योग्य निर्णयामुळे या बदलणाऱ्या प्रतिमेचा वेग प्रचंड वाढताना गेल्या काही दिवसात जास्त प्रकर्षाने जाणवत आहे. गेली ७ दशके जागतिक पातळीवर भारताची निर्माण झालेली प्रतिमा बदलायला वेळ लागणार हे अपेक्षित होतं. पण ती इतक्या लवकर बदलेल याची खूप शक्यता खूप कमी जणांना जाणवत होती. एकेकाळी जागतिक पातळीवर न्यूट्रल किंवा कोणत्याही बाजूने न झुकणारा, तसेच जागतिक मुद्यांवर सोडाच पण आपल्या घरातल्या मुद्यांवर पण संयत प्रतिमा देणारा देश अशी एक प्रतिमा जागतिक स्तरावर भारताची होती. त्यामुळे भारताच्या मताला कोणी विचारात घेत नव्हतं आणि त्याला किंमत पण दिली जायची नाही. 

भारत म्हणजेच भारताचं राजकीय नेतृत्व करणारे लोक, मंत्री हे काय बोलतात किंवा त्यांच्या बोलण्यामागे जागतिक पटलावर काही स्थितंतर येऊ घातली आहेत का? असे प्रश्न कधीच कोणत्या देशाला अथवा त्यांच्या राजकीय नेतृत्वाला पडलेले नव्हते. भारताची भूमिका काय असावी हे ही अनेकदा परदेशी शक्ती, विकसित देश किंवा भारताच्या भूमिकेचं चित्र जागतिक पातळीवर उभं करणारे टूलकिट ठरवत असे. ज्यात मोठ्या मोठ्या न्यूज एजन्सी, पत्रकार, संस्था आणि इतर लोक होते. ज्यांचे स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी अनेकदा भारताला गळचेपी भूमिका घ्यावी लागत होती. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष काय म्हणतात? भारताने एखाद्या मुद्यावर व्यक्त झाल्यावर युरोपियन राष्ट्रांची भूमिका काय असेल? रशियाला एखादी गोष्ट आवडेल का आवडणार नाही? देशातील अल्पसंख्याक लोकांची भूमिका काय असेल? अश्या अनेक गोष्टींवर भारताची प्रतिक्रिया गेल्या ७० वर्षात अवलंबून राहिलेली होती. अर्थात ती पूर्णपणे चुकीची होती असं मला अजिबात वाटत नाही. कारण परिस्थिती तशी होती पण अनेकदा परिस्थिती अनुकूल असूनसुद्धा भारताची भूमिका बदलण्याची ताकद असलेलं खंबीर नेतृत्व भारताकडे त्याकाळी नव्हतं हे आपल्याला मान्य करावंच लागेल. 

पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आज भारत आत्मविश्वासाने पुढे जातो आहे. आज अनेक आघाड्यांवर भारताची भूमिका काय असेल याकडे जगाचं लक्ष लागलेलं असते. भारताच्या भूमिकेवर जागतिक भूमिका आज मांडली जाते. या गोष्टीला दुजोऱ्या देणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडताना आपण आज अनुभवत आहोत. तुर्की खरे तर भारताचा शत्रू देश म्हणावा लागेल. पण त्यांच्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी भारताने केलेली मदत आज जगात चर्चेचा विषय ठरलेली आहे. ही मदत नुसती भारत सरकार पर्यंत मर्यादित नाही तर भारताच्या लोकांनी स्वहस्ते केलेल्या मदतीचा ओघ अजून थांबत नाही आहे. हा ओघ इतका मोठा आहे की तुर्की च्या भारतातील कार्यालयात भारतीयांनी पाठवलेल्या मदतीला सामावून घेण्यासाठी जागा नसल्याचं ट्विट तुर्कीच्या राजदूतांनी केलं आहे. हे सगळं भारत कश्या पद्धतीने जागतिक स्तरावर मदतीला उभा राहतो आहे याच प्रतीक आहे. 

येत्या महिन्याभरात जगातील ४ राष्ट्रप्रमुख भारतात येत आहेत. ज्यात २५-२६ फेब्रुवारीला जर्मन चॅन्सलर ओलॉफ शॉल्झ भारतात येत आहेत. त्या पाठोपाठ इटली च्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी भारतात दाखल होत आहेत. त्या जात नाही तोच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज ८ मार्च ला भारतात येत आहेत. त्या पाठोपाठ फ्रांस चे राष्ट्रप्रमुख इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात येत आहेत. एकाचवेळी युरोपातील ३ प्रमुख राष्ट्रांचे प्रमुख भारतात का येत आहेत? ते ही अवघ्या एका महिन्याच्या आत हे चित्र खूप काही विचार करायला लावणारं आहे. 

रशिया - युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने मांडलेली संयत आणि तटस्थ पण जबाबदारीची भूमिका जागतिक पटलावर नोंदली गेली आहे. आज भारत कोणाच्या बाजूने झुकतो यापेक्षा तो आपल्या विरुद्ध जाऊ नये यासाठी त्या त्या देशांचे प्रतिनिधी सगळे प्रयत्न करत आहेत. याच एक बोलकं उदाहरण म्हणजे जर्मनी चे भारतातील राजदूत फिलिप अकरमन यांनी आपल्या राष्ट्रप्रमुखांच्या भेटी आधीच,

"भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे हा जर्मनीसाठी चिंतेचा विषय नाही." 

हे सांगून जर्मनीची भूमिका स्पष्ट केली आहे. याचा अर्थ काय तर भारत रशियासोबत काय व्यवहार करतो यात जर्मनी ढवळाढवळ करणार नाही. जर्मनीच्या राष्ट्रप्रमुखांची भेट ही जर्मनी आणि भारत हितसंबंधांसाठी आहे. त्याचा भारताच्या युक्रेन - रशिया युद्ध भूमिकेशी काही देणंघेणं नाही. 

माझ्या ज्ञात इतिहासात तरी जर्मनी सारख्या प्रगत युरोपियन राष्ट्राने अशी उघड भूमिका घेतल्याचं माझ्या वाचनात नाही. भारताने काय करावं अथवा काय करू नये हे भारताला आजवर सांगत आलेला युरोप आज स्वतः चुकूनसुद्धा भारताच्या विरुद्ध अथवा भारताला दुखावणारी भूमिका न मांडण्यासाठी स्पष्टीकरण देण्यासाठी आटापिटा करत आहे. 

आज भारताकडे एखाद्याला झुकवण्याची ताकद मग ती आर्थिक असो वा सैनिकी किंवा इतर ती आहे. तसे निर्णय घेणारी सरकारी यंत्रणा आणि राजकीय नेतृत्व आहे. त्यामुळेच आज जग भारतापुढे झुकताना आपल्याला बघायला मिळते आहे. त्यासाठीच आज "झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये" ही युक्ती भारताच्या प्रतिमेबाबत खरी होताना दिसत आहे.  

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Tuesday 14 February 2023

'ईटा करीना'... विनीत वर्तक ©

 'ईटा करीना'... विनीत वर्तक  ©

ईटा करीना' हे नाव सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने खूपच अपरिचित असेल. ही एक ताऱ्यांची रचना आहे ज्यात दोन तारे आपसात एकमेकांभोवती फिरत आहेत. जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते तसेच दोन तारे एकमेकांभोवती फिरत आहेत. ईटा करीना बघताना एक सामान्य रचना वाटत असली तरी विश्वात असणाऱ्या अनेक ताऱ्यांच्या रचेनपेक्षा ईटा करीना वेगळी आणि खूप महत्वाची रचना आहे. ज्यात या दोन्ही ताऱ्यांची तेजस्विता ही सूर्याच्या प्रकाशापेक्षा ५ मिलियन (५० लाख) पटीने जास्त आहे. ७५०० प्रकाशवर्ष इतक्या अंतरावर हे तारे पृथ्वीपासून आहेत. ( एक प्रकाशवर्ष म्हणजे एका वर्षात प्रकाश जितक अंतर कापेल ते अंतर. प्रकाशाचा वेग सुमारे ३,००,००० किलोमीटर / प्रती सेकंद) 

'ईटा करीना' रचनेतील एक तारा सूर्यापेक्षा १०० पट मोठा आहे. इतक्या प्रचंड मोठा ताऱ्याच्या जवळच तितकाच दुसरा मोठा तारा आहे. सूर्यापासून शनी ग्रह जितका लांब आहे. तितकच हे अंतर आहे. आपल्याला हे अंतर जास्ती वाटल तरी अवकाश अंतराच्या मानाने हे अगदी कमी अंतर आहे. सूर्यापेक्षा तब्बल ५० लाख पटीने तेजस्वी असणारे दोन तारे एकमेकांच्या इतक्या जवळ आहेत की त्या दोघांच्या तेजस्वितेने तिथलं संपूर्ण अवकाश प्रकाशमान असते. या दोन्ही ताऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणात फ्युजन प्रक्रिया सुरु असते. या प्रक्रियेतून निर्माण झालेली उर्जा आणि प्रकाश हेच ताऱ्याला इतक्या प्रचंड स्वरूपात प्रकाशमान करत असतात. ताऱ्याच्या मधून निघणारी उर्जा आणि आण्विक किरण हे बाहेरच्या दिशेने प्रचंड बल निर्माण करते. पण त्याच वेळी ताऱ्याच्या प्रचंड वस्तुमानामुळे त्याच गुरुत्वीय बल हे उलट्या दिशेने कार्यरत असते. ह्या दोघातील समानता ताऱ्याला एकसंध ठेवते. म्हणजे ह्या दोघातील कोणतही बल जर कमी जास्त झाल तर ताऱ्याचा अस्त ठरलेला आहे.

कोणत्याही ताऱ्याचा जन्म होतानाच त्या ताऱ्याचा अस्त हा कसा होणार हे ठरलेलं असते. अणुप्रक्रियेमुळे निर्माण झालेली उर्जा किंवा बल आणि आपल्या वस्तुमानामुळे असलेलं गुरुत्वीय बल हे जोवर समान तोवर ताऱ्याच आयुष्य असते. ज्या वेळेला ताऱ्याच आयुष्य संपुष्टात येत असते तेव्हा न्यूक्लिअर फ्युजन आणि गुरत्वीय बल ह्यांच्यातील एकसंधपणा संपुष्टात येतो. सूर्याच्या बाबतीत बोलायचं झालच तर १ बिलियन वर्षानंतर सूर्याच्या प्रकाशात १०% वाढ होईल. ही  वाढ जास्ती नसली तरी तिचा पृथ्वीवर खूप मोठा परिणाम होईल. त्या नंतर सूर्याच आकारमान इतक वाढत जाईल की बुध, शुक्र ग्रह तर आपली पृथ्वी पण त्याने गिळंकृत केलेली असेल. तो एक रेड जायंट तारा झालेला असेल. त्यानंतर त्याचा प्रवास व्हाईट डार्फ ताऱ्याकडे होईल. 

सूर्याला जसा मृत्यू येणार आहे तसा प्रत्येक ताऱ्याचा होईल असं नसते. ताऱ्याच्या वस्तुमानावर त्याचा शेवट काय होणार हे ठरलेल असते. 'ईटा करीना' च्या बाबतीत ते वेगळ आहे. ईटा करीना मधील रेडीयेशन बल इतक प्रचंड आहे की त्याच्या गुरुत्वीय बलाला ते येणाऱ्या काळात वरचढ ठरेल. यामुळे त्यातील समतोल राखण त्याला अशक्य होत जाईल. रेडियेशन बल इतक प्रचंड होईल की त्यामुळे या दोन्ही ताऱ्यांचा महाकाय विस्फोट होईल (हायपरनोव्हा). कदाचित तो झाला ही असेल. कारण आपण आत्ता ज्या ईटा करीना चा प्रकाश बघत आहोत तो ७५०० वर्षापूर्वी तिकडून निघालेला आहे. इतक्या प्रचंड मोठ्या दोन ताऱ्यांचा स्फोट मानवजातीच्या पूर्ण प्रवासात कोणीच बघितलेला नाही. त्यामुळेच जेव्हा तो होईल तेव्हा तो असेल एक हायपरनोव्हा. हा हायपरनोव्हा एखाद्या सुपरनोव्हा पेक्षा तब्बल १०० पट जास्ती क्षमतेचा असेल. सूर्यापेक्षा ३० पट मोठा असलेल्या ताऱ्याचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा हायपरनोव्हा होतो. ईटा करीना मधील तारे सूर्यापेक्षा १०० पट मोठे आहेत. त्यामुळे आपण अंदाज लावू शकतो या स्फोटाचा नजारा अवकाशात काय असेल. 

ईटा करीना च्या आसपास जर एखादी सोलार रचना असेल तर त्यांचे दिवस भरले म्हणून समजा. याच्या कित्येक प्रकाशवर्ष जवळ असणारे तारे, ग्रह या स्फोटातून निघालेल्या प्रकाश आणि उर्जा यांनी नाही तर एक्स रे आणि गॅमा रे यांच्या माऱ्यामुळे नष्ट होतील. या किरणांचा मारा इतका प्रचंड असेल की आजबाजूचे अगदी शंभर ते हजारो प्रकाशवर्ष दूर असलेल्या ग्रह, तारे आणि आकाशगंगा यांच्या वर या रेडीयेशन चा परिणाम जाणवेल. त्याचं पूर्ण आयुष्य किंवा भविष्य बदलवण्याची ताकद ह्या विस्फोटात असेल.

आपल्या डोक्यात आलंच असेल की मग याचा पृथ्वीवर काय परिणाम होईल. तर पृथ्वी ७५०० प्रकाशवर्ष या ताऱ्यापासून लांब आहे. कोणतही रेडीयेशन हे इतक्या मोठ्या अंतरावर कमालीच घटते. तरीसुद्धा इतक्या लांब असून पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातून हे तारे विस्फोट झाल्यावर चंद्राइतके प्रखर, तेजस्वी उघड्या डोळ्यांनी दिसू शकतील. त्यातून पृथ्वीवर आदळणाऱ्या गॅमा रे आणि एक्स रे जरी पृथ्वीच्या जीवनमानावर फरक नाही करू शकले तरी नक्कीच चुंबकीय क्षेत्र तसेच इतर गोष्टींवर परिणाम करतील अस अनुमान आहे. ईटा करीनाचा विस्फोट किंवा हायपरनोवा नक्कीच अवकाशात बघणं हा एक वेगळा अनुभव असेल. प्रचंड अश्या ताऱ्याचा मृत्यू याची देही डोळा बघण म्हणजेच आपण किती सूक्ष्म आहोत याचा अनुभव घेणं. नक्कीच हे सगळ खूप रोमांचक असेल. एक प्रश्न आपण या निमित्ताने स्वतःला विचारूयात की इतक्या प्रचंड मोठ्या 'ईटा करीना' ताऱ्याला ही मृत्यू चुकला नाही तर आपण कोण? नाही का?

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.