Tuesday 28 June 2022

संस्कृतीची संस्कृती... विनीत वर्तक ©

 संस्कृतीची संस्कृती... विनीत वर्तक ©

भारताच्या संस्कृतीला हजारो वर्षांचा इतिहास आहे हे आपल्यापैकी प्रत्येकाला माहित आहे. त्या हजारो वर्षाच्या प्रवासाचे दाखले देणाऱ्या अनेक गोष्टी भारतात आजही अस्तित्वात आहेत. पण त्या ऐतिहासिक संस्कृतीची जपणूक करण्याची एक संस्कृती मात्र आपण भारतात रुजवू शकलो नाही ही एक मोठी खंत नेहमीच मला होती. आमचे पूर्वज फार थोर, मोठे आणि काळाच्या मानाने बरेच पुढे होते. आज त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा काळाच्या ओघात धूसर होत असताना त्याला जपण्याची एक सुरवात किंवा ती जपणूक करण्याची सुरवात भारताच्या पंतप्रधानांनी नुकतीच केली असं म्हंटल तर चुकीचं ठरणार नाही. भारताच्या या हजारो वर्षाच्या प्रवासात पिढ्यान पिढ्या कारागिरीच तंत्रज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेलं आहे. आज ही भारतात अश्या अनेक कारागिरी आणि ती साकारणारे कारागीर आहेत. त्यांच्या याच कारागिरी ला जगाच्या पटलावर आणून भारताच्या संस्कृतीला जपण्याची संस्कृती रुजवण्याची सुरवात झालेली आहे. 

नुकत्याच झालेल्या जगातील प्रगत राष्ट्रांच्या म्हणजेच 'जी ७' राष्ट्रांच्या बैठकीत उपस्थित असणाऱ्या प्रत्येक राष्ट्रप्रमुखाला भारताच्या हजारो वर्षांची कारीगरी जपणाऱ्या वस्तू पंतप्रधानांनी भेट म्हणून दिल्या आहेत. या प्रत्येक वस्तुंना तब्बल ४००० ते ५००० वर्षांचा इतिहास आहे. त्या वस्तू साकारण्याची पद्धत सुद्धा आजच्या फास्ट फॉरवर्ड जमान्यात जुनाट वाटली तरी ती एकमेव अशी आहे. त्यामुळेच या वस्तूंच्या मूल्यांपेक्षा त्या आपल्या सोबत भारताच्या हजारो वर्षाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रवास घेऊन आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच महत्व हे खूप जास्ती आहे. तर या वस्तू कोणत्या आहेत? त्या आपल्या सोबत काय घेऊन आल्या आहेत त्याचा संक्षिप्त आढावा. 

१) अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना मिनाक्षी पद्धतीने बनवण्यात आलेले ब्रूच आणि कफलिंक देण्यात आले आहेत. यात चांदीमधे वेगवेगळं डिझाईन बनवून त्यात मिना ग्लास आणि विशिष्ठ पद्धतीचं ग्लू एकमेकात मिसळून त्याला भट्टीत भाजण्यात येत. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की ही प्रोसेस लेयर बाय लेयर करण्यात येते. यात खूप कारीगरी लागते. तसेच ही पद्धत हजारो वर्षापासून विकसित झालेली आहे. या पद्धतीत त्याचा रंग हा अनेकदा गुलाबी होतो. त्यामुळेच याला मिनाक्षी असं म्हंटल जाते. वाराणसी, उत्तरप्रदेश इकडे आजही अश्या पद्धतीने हे खास दागिने बनवले जातात. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी यांना मॅच होईल या पद्धतीने हे खास तयार करण्यात आलेले आहेत. 

२) ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना बुलंदशहर, उत्तर प्रदेश इकडे बनवण्यात आलेली चहा ची मातीची भांडी दिलेली आहेत. ही भांडी विशिष्ठ पद्धतीने तयार केली जातात. एक बेस डिझाईन तयार झाल्यावर त्याला १२०० डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम केलं जाते. त्यात त्या नंतर वेगवेगळे रंग त्यात मेंदीच्या कोनाने भरले जातात. हे पुन्हा एकदा भट्टीत भाजलं जाते. ब्रिटिश पंतप्रधानांना देण्यात आलेल्या क्रॉकरी मधे प्लॅटिनम धातू असलेल्या रंगाचा वापर केला गेलेला आहे. कारण याच वर्षी ब्रिटिश राणी आपल्या सिंहासनाची प्लॅटिनम ज्युबली म्हणजेच ७० वर्ष साजरी करत आहे. त्याचा सन्मान म्हणून भारतीय संस्कृतीचा भाग असलेली आणि ब्रिटिश साम्राज्याचा सन्मान करणारी अशी ही चहाची भांडी त्यांना देण्यात आलेली आहेत. 

३) कॅनडा चे पंतप्रधान जस्टिन ट्रूडेउ यांना काश्मीर मधील कारागिरांनी बनवलेलं एक कार्पेट भेट दिलेलं आहे. हे कार्पेट संपूर्णतः रेशिमपासून बनवलेलं आहे. हातांनी विणलेलं आहे. या पद्धतीने बनवलेली कार्पेट जगात प्रसिद्ध आहेत. ही कार्पेट अतिशय मऊ असून त्यातील प्रत्येक धागा हा अतिशय मेहनत घेऊन विणला जातो. यातील रंगसंगती विशिष्ठ अशी असून वेगवेगळ्या बाजूने बघितल्यास वेगवेगळ्या रंगाचा आभास त्यातून होतो. तसेच दिवसा आणि रात्री त्याचे रंग हे वेगळे भासतात. 

४) फ्रांस देशातून आलेले परफ्यूम्स संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. त्याचसाठी फ्रांस चे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांना अत्तराची खास पेटी भेट दिलेली आहे. यात ६ वेगवेगळ्या पद्धतीची अत्तर असून यातील अत्तर बनवण्याची पद्धत ही तब्बल ५००० वर्षांचा इतिहास असलेली आहे. चंदनाच्या तेलाचा बेस म्हणून वापर करून या वेगवेगळ्या अत्तराची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर एका पद्धतीच्या अत्तरात गरम मसाल्या पासून तयार होणाऱ्या तेलाचा वापर केला आहे. तसेच या पेटीला खास फ्रांस च्या राष्ट्रध्वजातील रंगांनी सजवण्यात आलेलं आहे. 

५) इटली म्हंटल की इटालियन मार्बल आपल्या समोर येतो. इटालियन पंतप्रधान मारिओ ड्रगही यांना खास मार्बल इन्ले टॉप भेट म्हणून दिला आहे. या मार्बल वरील डिझाईन संपूर्णपणे हातानी बनवली गेली आहे. मार्बल मधे बनवलेल्या डिझाईन मधे खाचे करून त्यात वेगवेगळ्या रंगाचे मार्बल तुकडे बसवले गेले आहेत. त्यामुळे याच सौंदर्य खूप वेगळं आहे. 

६) जर्मन चान्सलर ओलॉफ शोल्झ यांना मेटल पॉट भेट दिलेलं आहे. निकेल धातूने कोटिंग केलेलं या भांड्यावर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. 

७) जपान च्या पंतप्रधानांना ब्लॅक पॉटरी भेट दिलेली आहे. याच वैशिष्ठ म्हणजे त्याचा काळा रंग. हा रंग पॉटरी ला तेव्हाच येऊ शकतो जेव्हा भट्टीत तापताना तिच्या आजूबाजूला ऑक्सिजन च अस्तित्व नसेल. हजारो वर्षांच्या पूर्वीपासून भारतीय कारागिरांना हे कसं शक्य करायचं हे माहित होतं. त्याच जुन्या पद्धतीने ही भांडी बनवली गेली आहेत. 

८) साऊथ आफ्रिकेचे प्रेसिडेंट सिरिल रामफॉस यांना डोकरा आर्ट पीस देण्यात आलेला आहे. या पीस च वैशिष्ठ म्हणजे हा पीस ४००० वर्ष जुन्या लॉस्ट वॅक्स कास्टिंग पद्धतीने बनवलेला आहे. अश्या पद्धतीने गोष्टी कास्टिंग करण्याची पद्धत फक्त भारतात हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात होती. जेव्हा जग गुहेत रहात होत तेव्हा भारतीय मेटल च कास्टिंग करून कलेचे नमुने तयार करत होते. त्याच संस्कृतीचा हा अर्थ पीस भाग आहे. 

९) अर्जेंटिनाचे राष्टपती अल्बर्टो फर्नांडीझ यांना डोकरा आर्ट मधे बनवलेल्या नंदी ची प्रतिकृती दिली आहे, नंदी च महत्व भारतीय पुराणात खूप आहे. शंकराच वाहन म्हणून नंदी हा नेहमीच पुज्यनीय राहिलेला आहे. 

१०) इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांना रामाच्या दरबाराची लाकडात कोरलेली प्रतिकृती भेट देण्यात आलेली आहे. इंडोनेशियावर भारताच्या संस्कृतीचा प्रभाव राहिलेला आहे. लाकडात कोरण्यात आलेली ही प्रतिकृती तितक्याच जुन्या कालावधीच प्रतिनिधित्व करणारी आहे. 

११) सेनेगल चे राष्टपती मॅकी सल यांना मुंज बास्केट आणि कॉटन ड्युरीज भेट दिलेली आहे. सेनेगल मधे आई कडून मुलीला विणण्याचे बाळकडू दिले जातात. त्याच धर्तीवर भारतात वर्षोनुवर्षे चालत आलेल्या विणण्याच्या कलेला या भेटीतून उजाळा देण्यात आलेला आहे. 

या सगळ्या भेटी अनेकांना सर्वसाधारण वाटू शकतात. या आधीही अश्या भेटी दिल्या गेल्या असतील. पण एकाचवेळी जगातील इतक्या सर्व नेत्यांना भारतीय संस्कृतीची जपणूक करणाऱ्या वेगवेगळ्या भेटवस्तू भेट म्हणून देताना एक नवीन पायंडा पाडला गेला आहे असं माझं मत आहे. हा पायंडा म्हणजे संस्कृती जपणाऱ्या संस्कृतीची सुरवात झालेली आहे. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की हे कारागीर भारताच्या एखाद्या कोपऱ्यात लपलेले आहेत. आज ते त्यांची कारागिरी भारतीयांन पर्यंत पोहचवण्यासाठी धडपडत आहेत. त्याचवेळी भारताचे पंतप्रधान जेव्हा जी ७ सारख्या प्लॅटफॉर्म चा वापर भारताच्या याच संस्कृतीला जगाच्या पातळीवर नोंद घेण्यासाठी करतात. तेव्हा एक प्रकारे भारताची संस्कृती जपण्यासाठी टाकलेलं ते खूप मोठं पाऊल असते. 

भेट दिलेली प्रत्येक गोष्ट नक्कीच ज्यांना भेट दिली आहे त्यांच्यासाठी विशेष अशी आहेच पण त्याच सोबत ज्यांनी तिची निर्मिती केली त्या भारतीय कारागिरांसाठी पण विशेष आहे. मला खात्री आहे यानंतर त्यांच्या हातातून घडल्या जाणाऱ्या आणि भारताच्या संस्कृतीचा हजारो वर्षाचा प्रवास सांगणाऱ्या हा कारागिरीला संपूर्ण जग कुर्निसात करेल. 

जय हिंद!!!

तळटीप :- पोस्ट चा उद्देश भारतीय संस्कृती आणि भारतीय कारागीर यांच्याशी निगडित आहे. या पोस्टचा वापर कोणत्याही राजकीय फायद्यासाठी करू नये अथवा राजकीय आणि व्यक्तीच गुणगान गाण्यासाठी ही पोस्ट लिहलेली नाही.  

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



2 comments:

  1. Varunraj Kalse7 July 2022 at 21:09

    Khupch sundr saglyat jast aawdlel mhnje tal tip... Aajkal kahihi post kel ki lagech tyacha wapar Rajkiy faydya sathi chalu hoto...
    Technology cha अपव्यय किंवा गैर फायदा....

    ReplyDelete
  2. खूप छान माहिती.

    ReplyDelete